भाजीपाला व्यावसायिकांचे उपायुक्तांना निवेदन

0

धुळे । देवपुरातील एसएनडीटी महाविद्यालयासमोरील भाजीपाल्यासह विविध छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे गेल्या आठवड्यात मनपातर्फे अतिक्रमण काढण्यात आले होते. त्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी हे व्यवसाय करीत आहेत. रितसर मनपाकडे कर भरणादेखील करत असताना गेल्या आठवड्यात कोणतीही पूर्वसूचना न देता व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्यात आले. भाजी विक्रेत्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवारी कारवाई केली.

जागा उपलब्ध असतांनाही अन्याय !
ज्या ठिकाणी विक्रेते बसतात ती जागा खासगी असल्याने महापालिकेने विक्रेत्यांवर कारवाई करू नये, अशी मागणी भाजीपाला व्यावसायिकांनी केली आहे. या विषयी उपायुक्त रवींद्र जाधव यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, देवपूर दत्त मंदिर परिसरातील एसएनडीटी महाविद्यालयासमोर आग्रा रोडलगत मोकळी जागा आहे. या जागेवर रोज दुपारनंतर भाजी बाजार भरतो. तो रात्री उशिरापर्यंत सुरू राहतो. मुख्य रस्त्याच्या बाजूला ही जागा असल्याने वाहतुकीला कोणताही अडथळा येतनाही. त्याचबरोबर ही जागा खासगी असून ती महापालिका आरक्षित करून संपादित करण्याची कार्यवाही करीत आहे. त्यामुळे जागा मालकाने न्यायालयात दाद मागितली आहे. अजूनही भूसंपादनाची कारवाई पूर्ण झालेली नाही. भाजी विक्री झाल्यावर विक्रेते निघून जातात. दरम्यान, सोमवारी सकाळी मनपा स्थायी समितीचे सभापती कैलास चौधरी यांची भेट घेऊन कैफियत मांडण्यात आली. त्यानंतर व्यावसायिकांनी पुनर्वसनासाठी महापालिकेवर भव्य मोर्चा काढला.