हडपसर। गेल्या काही वर्षांपासून हडपसरमध्ये मुख्य रस्त्यावरच भाजी विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. यामुळे गाडीतळ, पुणे-सोलापूर महामार्गावर आणि ससाणेनगर व हांडेवाडी रस्त्यांवर भरणार्या भाजी बाजाराला महापालिका पर्याय शोधणार का? असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून अपुर्या जागेत सध्याची भाजी मंडई भरत असून, तेथे दुर्गंधी पसरली आहे. पार्किंग नाही. अस्वच्छता आहे. अस्ताव्यस्त बैठक व्यवस्थेमुळे येथे बकालपणा आला असून अनेक समस्यांच्या गर्तेत ही सध्याची भाजी मंडई सापडल्यामुळे ती ओस पडली आहे.
पार्किंग नाही. स्वच्छता नाही. अस्ताव्यस्त बैठक व्यवस्थेमुळे बकालपणा आला असून अनेक समस्येच्या गर्तेत सध्याची भाजी मंडई सापडली आहे. त्यातच हडपसर क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत असलेल्या भागात पुणे-सोलापूर महामार्ग, ससाणेनगर रस्ता, हांडेवाडी रस्ता व काळेपडळ रस्ता या भागात मुख्य रस्त्यावरच अनधिकृतपणे रस्त्यांवरच भाजीपाला बाजार गेल्या काही वर्षांत वसला आहे.
विक्रेत्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी
हडपसर येथे मुख्य रस्त्यावर भाजीपाला विक्रेते बसत असल्याने ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करून वाहतुकीकडे दुर्लक्ष करत भाजीपाला खरेदी करत असतात. त्यामुळे रस्त्यावर अनेकदा वाहतूककोंडीदेखील होत असते. परंतु, रस्त्यावर भरणार्या भाजीपाला बाजाराला महापालिका पर्याय शोधणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. रस्त्यावर भरणार्या भाजी विक्रेत्यांवर अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाईही करण्यात येते. परंतु, कारवाईनंतर पुन्हा भाजी विक्रेते रस्त्याच्या बाजूला आपली दुकाने मांडत असतात. त्यासाठी महापालिकेने रस्त्यांवर बसणार्या भाजीपाला विक्रेत्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी अथवा भाजी मंडईत तीन शेड वापराविना ओस पडून आहेत. त्याठिकाणी त्यांचे स्थलांतर करावे, अशी मागणी नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे.
अपुर्या जागेत भाजी मंडई
महामार्गावर भरणार्या भाजी मंडईमुळे एखादा अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण, असाही सवालही उपस्थित होत आहे. पालिकेने आरक्षित केलेल्या व सध्याच्या भाजी मंडईत मोकळ्या जागेत भाजी विक्रेत्यांची सोय उपलब्ध करून देण्याची गरज आहे. वाढत्या लोकवस्तीत भाजी मार्केटची सुविधा मात्र महापालिकेला अद्याप पूर्ण करता आली नाही. भाजी मंडईच्या अपुर्या जागेत भाजी मंडई भरत असून, येथे दुर्गंधी पसरली आहे.