बारामती नगरपरिषदेकडून व्यापार्यांना गाळ्यांचे हस्तांतरण नाही
बारामती : बारामती नगरपरिषदेच्या मालकीचे श्री गणेश भाजी मार्केटमधून पूर्वीच्या गाळेधारकांना त्यांचे पूर्वीचेच गाळे हस्तांतरित करण्यात यावेत. यामध्ये नगरपालिकेने कोणताही हस्तक्षेप करू नये तसेच वशिलेबाजीने त्यात आदलाबदल करू नये. अशा मागणीचे निवेदन भाजपचे पदाधिकारी सुरेंद्र जेवरे यांनी नगरपालिकेस दिले आहे. बारामती नगरपालिकेने राज्यशासनाकडून सोळा कोटींचे अनुदान देऊन भाजी मार्केटची इमारत बांधली आहे. इमारत बांधण्यापूर्वी त्याठिकाणी पूर्वी व्यापार करीत असलेल्या व्यापार्यांना इमारत बांधून पूर्ण झाल्यावर विनाशर्त दुकानदारी त्याच व्यापार्यांना हस्तांतरित करण्याची वचन व पत्र नगरपालिका प्रशासन व सत्ताधार्यांनी दिली होती.
परंतु नगरपालिका प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे व सत्ताधार्यांच्या निष्क्रियतेमुळे इमारत बांधून एक वर्ष पूर्ण होत आली तरीदेखील व्यापार्यांना दुकाने व गाळे हस्तांतरित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे व्यापार्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच गाळे हस्तांतरीत न झाल्यामुळे नगरपालिकेचे दरमहा लाखो रुपयांचे भाडे बुडत आहे. असा आरोप जेवरे यांनी केला आहे. जेवरे यांनी मार्चमध्ये याविषयी नगरपालिकेसमोर उपोषणदेखील केले होते. तेव्हा 30 एप्रिलपर्यंत सर्व गाळेधारकांचे प्रश्न सोडवू असे लेखी पत्र त्यांना दिले होते.
परंतु आजतागायत हे प्रश्न प्रशासन व सत्ताधारी पदाधिकारी यांनी सोडविलेले नाहीत. व्यापार्यांचे व नगरपालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान सुरूच आहे. याच प्रश्नावर जेवरे व त्यांचे सहकारी पुन्हा 22 जुलैला बेमुदत चक्री उपोषणास बसले होते. तेव्हादेखील नगरपालिकेने उशिरा का होईना नगरविकास खात्याकडे या गाळेधारकांचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले होते. मात्र नगरपालिका कोणताही पाठपुरावा करताना दिसत नाही. यामुळे गाळेधारक त्रस्त झालेले असून वेळेत न्याय मिळावा अशी मागणी करीत आहे असेही जेवरे यांनी सांगितले.