शिरपूर । तालुक्यातील भाटपुरा येथील शेतजमिनी नोंदणीकृत खरेदीखताने विकल्यानंतर तसेच 7/12 नवीन खरेदीदाराच्या नावे होवून खरेदीखतानुसार रितसर ताबा दिल्यानंतर सुद्धा शेतजमीन विकत देणार्या शेतकर्याने शेतजमिनीत जबरदस्तीने घुसून शेतातील शेतमाल चोरून नेल्याबद्दल न्यायालयाच्या आदेशाने पाटील दाम्पत्यांविरोधात थाळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांता मधुकर पाटकर रा.भाटपुरा ता.शिरपूर ह.मु.पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निंबा काशिनाथ पाटील व सुषमा निंबा पाटील, रा.भाटपुरा ता.शिरपूर यांनी मौजे अजनाड येथील शेत गट नं.43/1, 43/1ब व 43/1 क ह्या शेतमिळकतीमध्ये जबरदस्तीने घुसून अंदाजे रू. 15000/- किंमतीचे शेतातील भुईमुगाचे पीक चोरून नेवून परस्पर विकले असून सौ.पाटकर यांचे मालकीच्या शेतात न्यायालयाने मनाई केलेली असतांनासुद्धा बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून शेतमालाची चोरी करून आर्थिक नुकसान केले. तसेच न्यायालयीन आदेशाचा अवमान केला. पाटकर यांनी या संदर्भात न्यायालयात धाव घेवून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रारी अर्ज दिला. यावर कामकाज करण्यात आले. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने निंबा काशिनाथ पाटील व सुषमा निंबा पाटील यांच्याविरूद्ध थाळनेर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.