शिरपूर। तालुक्यातील भाटपुरा येथे शेतात थ्रेशर मशिनने मुग काढत असतांना मशिनमध्ये अडकून 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी 4 रोजी दुपारी घडली. तालुक्यातील भाटपुरा येथील मच्छिंद्र महारु बागले यांच्या शेतात थ्रेशर मशिनने मुग काढण्याचे काम सुरू होते.
याठिकाणी कपिल तुकाराम भिल (18) हा युवक मजुर म्हणून काम करीत होता. या मशिनजवळ मुगाच्या टोपल्या टाकण्याची जबाबदारी त्या युवकावर होती. मुग काढण्याचे काम झाल्यानंतर मशिन बंद करण्यात आले. त्यावेळी अचानक कपिल हा मशिनकडे ओढला गेला त्यात अडकून त्याचा मृत्यू झाला. घटनेचे वृत्त कळताच गावातील शामकांत करंकाळ, शांतीलाल पाटकर, भुरा पाटकर, शांतीलाल महाजन आदि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. मयत कपिल भिल हा धुळे येथे इयत्ता 11 वीत शिकत होता. शाळेला सुट्टी असल्यामुळे तो आपल्या गावी आला होता. त्याचे आईवडील हे मोल मजुरी करतात. आई वडीलांना आर्थिक मदत होईल या हेतुने तो त्या मशिनवर कामासाठी गेला होता.