शिरपूर:तालुक्यातील भाटपुरा गावात ४८ वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर गावाच्या सीमा सील करण्यात आल्या आहे.कोरोनाबाधित रुग्णासह त्याच्या पत्नीला धुळे येथे रवाना करण्यात आले असून गावातील १५ जणांना हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून घोषित केले आहे. त्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
१९ मे रोजी संबंधिताला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. संशयावरून कोरोना तपासणीसाठी त्याचे नमुने घेण्यात आले. धुळे येथे तपासणी केल्यावर तो पॉझिटिव्ह आढळला.त्यामुळे येथील प्रशासनाला सुचित करण्यात आले.त्यानंतर प्रांताधिकारी डॉ.विक्रमसिंह बादल,तहसीलदार आबा महाजन,गटविकास अधिकारी वाय.डी.शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसन्न कुलकर्णी आदींनी भाटपुरा येथे भेट दिली. सरपंच शैलेंद्र चौधरी, पोलीस पाटील एकनाथ राठोड, ग्रामसेवक पेंढारकर यांच्या सहकार्याने गावाच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत.
संबंधित रुग्णाला कोरोनाचा संसर्ग कुठून झाला याबाबत वेगवेगळ्या चर्चा आहेत. त्याला अनेक व्याधी असून त्यावर भुसावळ, जळगाव, चोपडा ठिकाणी उपचार सुरु होते.१८ मे रोजी त्याच्या मुलीचे लग्न झाले. भाटपुरा गावात या लग्नासाठी भुसावळ येथील पाहुण्यांनी हजेरी लावली होती. संसर्ग कुठून झाला याचा तपास प्रशासन करीत आहे. गंभीर बाब म्हणजे तपासणीसाठी नमुने घेतल्यानंतर अहवाल येण्यापूर्वीच हा रुग्ण खाजगी वाहनाने भाटपुरा येथे पोहोचला होता.