शिरपूर । तालुक्यातून स्थलांतर करून चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे आपल्या मालकीच्या जनावरांना चराईसाठी घेवून जात असतांना मार्गावरील भाटपुरे गावालगत असलेल्या एका शेतात ज्वारीचे दुबार पिक जनावरांना खाऊ घातल्याने झालेल्या विष बाधेत सुमारे 12 ते 14 लहान मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला तर पशुवैद्यकीय अधिकार्यांना 32 जनावरांना वाचविण्यात यश आले आहे. ही घटना दि. 14 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. शिरपूर तालुक्यातील दहिवद लगत गेल्या अनेक वर्षांपासून नानाभाई भरवाड, वाघाभाई बिजाभाई भरवाड, धुळाभाई बिजाभाई भरवाड, भोलाभाई धुला भरवाड हे आपल्या कुटूंब व गायी वासरांसह वास्तव्यास आहेत. तेथून ते दरवर्षी जनावरांना नोव्हेंबर महिन्यात चोपडा तालुक्यातील विरवाडे येथे चराईसाठी घेवून जात असतात.
थोड्या थोड्या अंतराने जनावरे पडू लागली मरण
मंगळवार 14 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे दहिवदहून जनावरे हाकलत ते चोपड्याकडे जात असतांना मार्गावरील भाटपुरे फाट्यालगत असलेल्या परशुराम गार्डन जवळील राजेंद्र राजपूत भवाळेकर ह.मु.सावेर ता.शिरपूर यांच्या शेतातील ज्वारीच्या दुबार पिकांत राजपूत यांना विचारून जनावरे चरण्यासाठी सोडली. काही वेळानंतर पुन्हा मार्गस्थ झाल्यानंतर एक-एक जनावर मरून पडू लागले. तर काही तडफडत होते.त्यामुळे शिरपूरातील पशुसंवर्धन सहाय्यक आयुे डॉ.उमेश बारी ,पशुवैद्यकीय डॉक्टर एन.डी.अहिरे मांजरोद, सी.पी.शिरसाठ टेकवाडे, मंगेश सोनवणे शिरपूर , विजय देशमुख गिधाडे, शेख अफसर होळनांथे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी सर्व जनावरांवर ताबडतोब औषधोपचार केला मात्र 12 ते 14 लहान मोठया जनावरांचा मृत्यू झाला तर जवळपास 32 जनावरांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्यातील देखील काहींचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तळहाताच्या फोडाप्रमाणे जनावरांना लहानाचे मोठे केल्यानंतर त्यांचा अशाप्रकारे दुर्देवी मृत्यू झाल्याने काठेवाडी हताश झाले होते. ह्या जनावरांनी ज्वारीचे दुबार पिक खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली असावी त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा असे पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.उमेश बारी यांनी सांगितले.