भाडेकरूच्या जाचाला कंटाळून वृध्दाची आत्महत्या

0

जळगाव । कराराने दिलेले दुकान भाडेकरू कडून बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याच्या नैराश्यातून पंचमुखी हनुमान मंदिराजवळील वृध्दाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 7.45 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. रमेश रतन विभांडीक उर्फ सोनार (वय-68) असे मयत वृध्दाचे नाव आहे. दरम्यान, विभांडीक यांनी आत्महत्येपूर्वी जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने लिहीली असून त्यात छळ करणार्‍या तिघांविरूध्द कारवाई व्हावी असा उल्लेख केला आहे. तसेच आत्महत्येस जबाबदार असेल्यांवर गुन्हा दाखल करून अटक करावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा सकाळी नातेवाईकांनी घेतला होता. तर जिल्हापेठ पोलिस ठाण्यातही नातेवाईकांनी गर्दी केली होती.

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
रमेश विभांडिक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अखेर बुधवारी सायंकाळी राहुल रमेश विभांडिक यांच्या फिर्यादीवरुन अरुण प्रल्हाद कस्तुरे, बंटी अरुण कस्तुरे, मॉन्टी अरुण कस्तुरे, रमेशचंद्र बद्रीनारायण पुरोहित, नंदकिशोर शिवकुमार जोशी यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय आराक करीत आहे.

साहेब…यांची कसून चौकशी करा…
रमेश विंभाडीक यांनी विषारी द्रव्य प्राशन करण्यापूर्वी लिहीलेली एक सुसाईड नोट त्यांच्या खिशात मिळून आली. त्यात भाडेकरू अरूण कस्तुरे यांनी न्यायालयीन नोटीस देवून आपला झाला व्यवहार तोंडी असल्याचे सांगून खोटी केस केली आहे. तर त्यांच्याकडून घेतलेले पैसे ते देखील मी परत केले आहे. नोटीस पाठवून माझे दुकान हडप करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. तर याच अरूण कस्तुरे याने नविपेठेतील त्याचे भाड्याचे दुकान स्वत:च जाळले. तर एका पाटलाची जागाही त्याने बळकावली आहे. तर माझा कोणताही तोंडी व्यवहार झालेला नसून माझी जागा बळकवायची आहे. असे सुसाईड नोटमध्ये नमुद केलेले आहे. तसेच हतबल होवून मी हा आत्महत्येचा उपाय शोधला असल्याचे विभांडीक यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. तर मला टेन्शन देणारे अरुण कस्तुरे, बंटी कस्तुरे, मोन्टी कस्तुरे यांचा देखील सुसाईड नोट मध्ये उल्लेख आहे. तर साहेब या तिघांवर कारवाई करवी अशी विनंती देखील सुसाईड नोटमधून विभांडीक यांनी केली आहे.

पोलिस ठाण्यात गर्दी
सोमवारी दुपारी 4 वाजेपासून रमेश विभांडीक यांनी विषप्राशन केल्याचे लक्षात येताच त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. दरम्यान, आज बुधवारी सकाळी 7.45 वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी कुटुंबियांनी भाडेकरू अरूण कस्तुरे यांच्या जाचाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचा आरोप करून सुसाईड नोटवरून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे नातेवाईकांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. पोलिसांनी मिळालेली सुसाईड नोट जप्त केली आहे. दरम्यान, रमेश विभांडीक यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, 1 मुलगी असा परिवार आहे.

दुकान बळकावून भाडेकरुने दिला होता मानसिक त्रास
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रमेश रतन विभांडीक यांचे नेरी नाका स्मशानभूमीसमोर प्लॉट क्र.137/1-2 पत्र्याचे शेड आहे. हे शेड (दुकान) गेल्या पाच वर्षापासून अरुण प्रल्हाद कस्तुरे यांना गॅरेजसाठी 11 महिन्यांच्या कराराने भाड्याने दिले आहे. त्यासाठी 5 हजार रुपये भाडे ठरले होते. दरवर्षी कराराचे नुतनीकरण केले जात होते. नोव्हेंबर 2016 मध्ये करार संपले आणि विभांडीक यांनी कस्तुरे यांच्याकडून डिपॉझीट स्वरुपात घेतले 5 लाख व 1 लाख व्याजासह परत केले. त्यानंतर शेडचा ताबा मागीतला. परंतू करार संपून दहा महिने झाले होते, तरीही कस्तुरे शेड सोडायला तयार नव्हते व भाडेही देत नव्हते. त्यामुळे विभांडीक हे चिंताग्रस्त झाले होते. तर कस्तुरे यांनी शेडचा ताबा देण्यास नकार देवून या उलट रमेश विभांडीक यांना न्यायालयामार्फेत नोटीस पाठविली. या प्रकारामुळे रमेश विभांडीक गेल्या महिन्याभरापासून हतबल झाले होते. यामुळे आलेल्या नैराश्यातूनच त्यांनी आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

सोमवारी घेतले विष
सोमवारी 3 जुलैला दुपारी 4 वाजता रमेश विभांडीक यांनी घरात विष घेतले. यावेळी त्यांच्या तोंडाला फेस येत असल्याचे मुलगा राहूल यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना बुधवारी सकाळी 7.45 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांनी रूग्णालयात एकच आक्रोश केला. तर रूग्णालय परिसरात नातेवाईकांची एकच गर्दी झाली होती. पंचमुखी हनुमान मंदिर परिसर हा विभांडीक यांच्या निवासस्थानाचा भाग व ज्या जागेबाबतचा वाद सुरु होता त्या नेरी नाका परिसरातील भाग याच्या जवळच असणार्‍या रुग्णालय परिसरात दोन्ही भागातील रहिवासी व व्यावसायिक बांधवांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करुन घटनेबद्दल विविध चर्चेला उधाण आले होते.