भाडे आकारणीत गैरव्यवहाराचा आरोप

0

जळगाव । महापालिकेचे सागरपार्क मैदान भाड्याने देतांना व्यावसायिक वापरासाठी ठरावानुसारचे दर न वापरता कमी दराने महापालिकेचे सुमारे 95 हजार रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक पुथ्वीराज सोनवणे यांनी आज स्थायी समितीच्या सभेत केला. यावर संबधितांकडून पैसे वसुल करण्याच्या सुचना सभापती वर्षा खडके यांनी दिल्यात. उपायुक्तांनी चौकशी आश्वासन दिले.महापालिकेची स्थायी समितीची सभा आज शुक्रवारी झाली. सभेत व्यासपीठावर सभापती वर्षा खडके, उपायुक्त चंद्रकांत खोसे, शहर अभियंता बी.डी.दाभाडे व नगरसचिव अनिल वानखेडे उपस्थित होते. सुरुवातीला सभेत विषयपत्रिकेवरील मागील बैठकीचे इतिवृत्त कायम करणे, गोलाणी मार्केटच्या 3 महीन्याच्या स्वच्छतेसाठी प्रतिगाळा 1100 रुपये वसुल करण्याचा प्रस्ताव, मृत जनावारांची विल्हेवाट लावण्यासाठी दोघा कर्मचार्‍यांची नियुक्ती करणे, आगींच्या अहवालाची माहीती घेणे, साप्ताहीक लेखा अहवालांची माहीती घेणे यासह आयुक्तांनी केलेल्या सविंदाची माहीती घेण्याच्या 6 विषयांना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.

गैरव्यवहार करणार्‍यांवर कारवाई करा
सभेमध्ये पुथ्वीराज सोनवणे यांनी सागरपार्क मैदाने भाडे आकारणीत गैरव्यवहार झाल्याच्या विषयावरुन प्रशासनाला धारेवर धरले. सागरपार्क मैदानाच्या भाड्याचे दर महासभेतील ठरावानुसार निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार व्यावसायिक वापरासाठी प्रतिदिन 50 हजार रुपये दर ठरला होता. मात्र गेल्या महिन्यात एका कंपनीला दोन दिवस व्यावसायिक प्रदर्शनासाठी देण्यात आले होते. त्यांच्याकडून 1 लाख रुपयांची आकारणी न करता केवळ 5 हजार रुपये घेण्यात आले. त्यामुले यामध्ये 95 हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोनवणे यांनी केला. वर्षाभरात अनेकवेळा हा प्रकार झाल्याचे ही रक्कम आणखी वाढू शकते असेही त्यांनी सांगीतले याबाबत कारवाईची मागणी केली. उपायुक्तांनी यावर चौकशीचे आदेश देवून वर्षभरातील व्यवहारांची माहीत कीरकोळ वसुली विभागाकडून मागविली आहे.

अग्निशमवरही चर्चा
महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे गेल्या तिन वर्षांपासून सुमारे 1 कोटी 60 रुपयांचा निधी पडून आहे. मात्र हा निधी खर्च न केल्याने नविन निधी मिळत नसल्याचे नितिन बरडे यांनी सांगीतले. यातील केवळ 23 लाख रुपयांचे प्रस्ताव तयार आहेत. तर 17 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. अग्निशमनकडे केवळ दोनच फायर फायटर आहेत., सुविधा नाही असे असूनही निधी खर्च केला जात नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. आरोग्य विभागाने कचरा वाहून नेण्यासाठी घेतलेल्या हातगाड्या, प्लॉस्टीकच्या कुंड्यांचा वापर न करता त्या गणपती नगरातील एका नागरिकांच्या अंगणात ठेवून दिल्याचे फोटो नगरसेवक पुथ्वीराज सोनवणेंनी दाखविले यामुळे महापालिकेच्या पैशाचा अपव्यय होत असल्याने कारवाईची मागणी केली. यासह सभेत पथदिवे, रस्ते स्वच्छतेच्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.