भातखेडा गावातील विद्यार्थ्यांना मिळाली बस; आंदोलनाचे फलित

0

रावेर । भातखेडा गावातील विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नसल्याने 30 रोजी बस रोखून शाळेपर्यंत विद्यार्थी पायी चालत गेले होते त्याची दखल घेऊन परिवहन विभागाने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी स्वतंत्र बस उपलब्ध करून दिली. भातखेड्यातील सुमारे 150 विद्यार्थी दररोज शाळेत जाण्यासाठी डाटी-वाटीत प्रवास करीत होते. गेल्या तीन वर्षापासून अनेक वेळा ग्रामपंचायतीने परिवहन महामंडळाला स्वतंत्र बस देण्याची मागणी केली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात असतांना विद्यार्थ्यांकडून प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी बस स्थानकावर दोन तास बस रोखून धरली आणि त्यानंतर रावेरच्या शाळेपर्यंत पायी प्रवास केला. याची दखल घेऊन परिवहन मंडळाने स्वतंत्र बस सुरू केली. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास भातखेडा गावात बस येताच ग्रामस्थांनी बसला हार, श्रीफळ अर्पण करून पूजा केली. अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी आनंद साजरा केला. अखेर गावकर्‍यांच्या तीन वर्षांच्या लढ्याला यश आले आहे. भातखेडा, उटखेडा येथे एकच बस जाऊन तेथील विद्यार्थी शाळेत आणत असे परंतु विद्यार्थी संख्या जास्त असल्याने स्वतंत्र बस देण्याची मागणी करण्यात आली होती. भातखेडा गावाला बस देण्यात आल्याचे आगारप्रमुख रणवीर कोळपे यांनी सांगितले.