दिल्ली – बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सलग दुस-या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला चितपट केले. रविवारी दिल्ली कसोटीच्या तिस-या दिवशी रोहित ब्रिगेडने कांगारूंना 6 गडी राखून मात देत चार सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली.
रविंद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी दिल्ली कसोटीच्या तिस-या दिवशी कांगारूंना त्यांच्या दुस-या डावात गुडघे टेकायला भाग पाडले. या दोघांनी अवघ्या दीड तासात ऑस्ट्रेलियाचे नऊ फलंदाज तंबूत पाठवून संपूर्ण संघ 113 धावांमध्ये गारद केला. याचबरोबर एका धावेच्या आघाडीसह पाहुण्या संघाने भारतापुढे विजयासाठी 115 धावांचे लक्ष्य ठेवले. जे टीम इंडियाने 4 गडी गमावून यशस्वीरित्या गाठले.
जडेजाने सात तर आर अश्विनने तीन बळी मिळवून कांगारूंचा धुव्वा उडवला. कांगारूंसाठी ट्रॅविस हेड (43), आणि लॅबुशेन (35) यांनाच दुहेरी आकडा गाठण्यात यश आले. या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या करता आली नाही.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात रविचंद्रन अश्विनने भारतीय संघाला यश मिळवून दिले. दुसऱ्या डावात 65 धावांच्या स्कोअरवर त्याने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. ट्रॅव्हिस हेड 46 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. यष्टिरक्षक श्रीकर भरतने त्याचा झेल टिपला. हेडने आपल्या खेळीत सहा चौकार आणि एक षटकार लगावला.
85 धावांवर ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट पडली. रविचंद्रन अश्विनने पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथला आपली शिकार बनवले. स्मिथने 19 चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने नऊ धावा केल्या. अश्विनच्या चेंडूवर स्वीप करण्याच्या प्रयत्नात चेंडू पॅडवर आदळला. अश्विनने जोरदार अपील केले. मैदानी पंचांनी स्मिथला बाद दिले. मात्र, स्मिथने रिव्ह्यू घेतला, पण तो स्वत:ला वाचवू शकला नाही.
हेड आणि स्मिथ यांच्यानंतर मार्नस लबुशेन देखील तंबूत परतला. रवींद्र जडेजाने त्याला क्लीन बोल्ड करून 95 धावांवर ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला. लबुशेनने 50 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या.
22.6 व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 95 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. अश्विनने मॅट रेनशॉला पायचीत करत कांगारू संघाला पाचवा धक्का दिला. रेनशॉने आठ चेंडूंत दोन धावा केल्या.
रवींद्र जडेजाने 23.1 व्या षटकांत भारताला सहावे यश मिळवून दिले. त्याने पीटर हँड्सकॉम्बला विराट कोहलीकरवी शून्यावर झेलबाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर (23.2) भारताला सातवे यश मिळाले. जडेजाने पॅट कमिन्सला क्लिन बोल्ड केले.
27.1 व्या षटकात जडेजाने अॅलेक्स कॅरीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यासह त्याने पाच विकेट पूर्ण केल्या. कॅरीने 10 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने सात धावा केल्या.
113 धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाची नववी विकेट पडली. रवींद्र जडेजाने नॅथन लायनला बोल्ड केले. लियॉनने 21 चेंडूत आठ धावा केल्या. जडेजाची या डावातील ही सहावी ठरली.
ऑस्ट्रेलिया 113 धावांवर गारद
जडेजाने कुहनमनला बाद करत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 113 धावांत गुंडाळला. कुहनमनने दोन चेंडूंचा सामना केला आणि त्याला खातेही उघडता आले नाही.