भाताचे आगार असलेल्या मुळशी तालुक्यात नाचणीच्या पिकाची प्रात्यक्षिके

0

मुळशी । भाताचे आगार अशी मुळशी तालुक्याची ओळख आहे. परंतु मुळशी तालुक्यात नाचणीची उत्पादकता खूप कमी असून प्रति हेक्टरी 6 क्विंटल आहे. नाचणीची ही उत्पादकता 50 टक्के इतकी वाढविण्याचे लक्ष ठेवून हा प्रकल्प राबविण्याचे ठरले. टेमघर आणि भोईणी या गावात नुकतीच नाचणीच्या पिकाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. या प्रकल्पाची शास्त्रज्ञ डॉ. हनुमंत घाडगे यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. कीड रोग व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

बियाण्याचा मोफत पुरवठा
कृषी विभागाच्या वतीने सुरुवातीला शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. अझोस्पिरिलीयम ची बीज प्रक्रिया करण्यासाठी सांगण्यात आले. फुले नाचणी या सुधारीत बियाण्याचा मोफत पुरवठा करण्यात आला. नाचणीची पुर्नलागवड ओळीत (तासात) केली गेली. पारंपारिक खता ऐवजी युरीया ब्रिकेटचा वापर करण्यास शेतकर्‍यांना उद्युक्त करण्यात आले. या नवीन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष किती फरक पडतो? हे पाहण्यासाठी फुले, नाचणी शेजारीच स्थानिक नाचणीचा कंट्रोल प्लॉट लावला. ही पीक प्रात्यक्षिके पाहिल्यानंतर शास्त्रज्ञ यांनी उत्पादनाचे उद्दिष्ट गाठले जाईल, याबाबत विश्वास व्यक्त केला.

अधिकार्‍यांचे शेतकर्‍यांना मार्गदर्शन
शेती दिनाच्या कार्यक्रमात या पुढील काळात नाचणीवर पडणारे कीड व रोग व त्यावरील उपाय योजना याबाबत डॉ. घाडगे यांनी मार्गदर्शन केले. काढणीनंतर नाचणीची प्रतवारी व पॅकिंगबाबत सांगितले. नाचणीचे सत्व, पापड इत्यादी मूल्यवर्धित उत्पादनाची माहिती दिली. आर. एस. गुंडाळकर यांनी टेमघरमध्ये तर ए. एच. इनामदार यांनी भोईणीमध्ये प्रकल्प राबवला. यासाठी शिवसेनेचे नेते दत्ता झोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रकल्पाचे उत्कृष्ट नियोजन पर्यवेक्षक पी. एस. राऊत यांनी केले. तालुका कृषी अधिकारी जी. के. तांबे आणि मंडळ अधिकारी आर. जी. मुळीक यांनी मार्गदर्शन केले.