मुरबाड । तालुक्यातील सरळगाव, टोकावडे, धसई, म्हसा, माळ, पठार व मुरबाड परिसरात भात कापणी अंतिम टप्यात आहे. तर भात झोडणीसाठी व मळणीसाठी मजुरांची चणचण भासत आहे. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा त्रस्त झाला आहे. तालुक्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात भात पिकाची नासाडी झाल्यामुळे तसेच भात पिकाची कामे वेळेवर होऊ शकली नाहीत व पावसाने सतत उघडझाप दिल्याने रखडलेली भात कंपनीची कामे अंतिम टप्यात आली आहेत. मात्र ही कामे एकाच वेळी सुरु झाल्याने तालुक्यात मजूर मिळणे कठीण झाले आहे.
मजुरांची चणचण
भात कापणीसाठी वाढीव मजुरी देऊन कशीबशी शेतकर्याने भात कापणी केली. परंतु झोडणी आणि मळणीसाठी मजुरांचा तुटवडा भासत आहे. सध्या भात झोडणीसाठी 300 ते 400 रुपये इतकी मजुरी द्यावी लागत आहे. ऐन महागाईच्या काळात भात पिकाचे एकूण उत्पन्न जमेस धरता एवढा खर्च भात शेतीसाठी करणे शेतकर्यांना परवडणारे नाही. त्यामुळे शेती सोडून मजुरी करावी अशा प्रतिक्रिया शेतकर्यांनी दिल्या.