भादलीत ब्लॉक ; दुसर्‍या दिवशी 15 रेल्वे गाड्यांना बसला फटका

0

भुसावळ- भादली रेल्वे यार्डातील तिसर्‍या लाईनच्या जोडणीचे काम रेल्वे प्रशासनाने गुरुवारपासून (दि.6) सुरू केले आहे. त्यामुळे गुरूवारी सात तर शुक्रवारी अप-डाऊन मार्गावरील 15 रेल्वे गाड्यांना फटका बसला. भादली यार्डातील कामामुळे या गाड्यांना अन्य स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आले होते. भादली रेल्वे यार्डातील कामांमुळे 6 ते 9 सप्टेंबर या काळात ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे सूरत, देवळाली व मुंबई पॅसेजर रद्द करण्यात आली आहे. शुक्रवारी अप मार्गावरील गोदान 2.20 तास, पुष्पक 2 तास, ताप्ती गंगा 7 तास, साकेत एक्स्प्रेस 2.30 तास, कामायनी, लखनाऊ सुपर, रत्नागिरी एक्स्प्रेस प्रत्येकी एक तास, तसेच पटना सुपर, काशी एक्स्प्रेस, शिर्डी कालका या गाड्या अर्धातास विलंबाने धावल्या. डाऊन मार्गावरील महाराष्ट्र एक्स्प्रेस 3.5 तास, अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस 45 मिनीटे, कुर्ला-वाराणसी रत्नागिरी एक्स्प्रेस एक तास, गितांजली एक्स्प्रेस चार तास तर गोवा, काशी एक्स्प्रेस या गाड्या 30 मिनिटे विलंबाने धावल्या. या गाड्यांव्यतिरिक्त अन्य काही गाड्या विभागातील रेल्वे स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. आणखी दोन दिवस भादलीतील ब्लॉक कायम राहणार आहे. दरम्यान, शुक्रवारी डाऊन महाराष्ट्र एक्स्प्रेसला ब्लॉकचा फटका बसला. शुक्रवारी ही गाडी तब्बल साडेतीन तास विलंबाने भुसावळ स्थानकावर पोहोचली. दररोज सकाळी 9 वाजता भुसावळात येणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता आली, त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले.