Murder of young man in Jalgaon city near Bhadali जळगाव : जळगाव शहरातील 35 वर्षीय तरुणाचा भादली गावाजवळील पाटचारीनजीक खून झाल्याची घटना सोमवार, 3 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. सौरभ यशवंत चौधरी (35, रा.काशीबाई उखाजी कोल्हे, दशरथ नगर, जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा खून नेमका कुणी व का केली? याचा शोध पोलिस प्रशासनाकडून घेतला जात आहे.
पोलिस अधिकार्यांची धाव
भादली शिवारातील भादली-कानसवाडा रस्त्यावरील पाटचारीजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याची माहिती भादली पोलिस पाटील राधिका ढाके यांनी नशिराबाद पोलिसांना सोमवारी सकाळी कळवली होती. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, समाधान पाटील, संकेत झांबरे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केल्यानंतर तरुणाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले.