जळगाव। भादली गावातील भोळे वाड्यात 20 मार्च रोजी समाजमन सुन्न करणारी दुर्दैवी घटना घडली. भोळे कुटुंबातील पती, पत्नीसह दोन मुलांची निर्घृण खुन करण्यात आली होती. या हत्याकांडाला दीड महिना उलटला. तरी संशयितांचा थांगपत्ता पोलिसांना लागला नाही. 4 मे रोजी हजर झालेले नुतन पोलिस अधीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घटनास्थळाला भेट दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक बच्चन सिंग, सहयोगी पोलिस अधीक्षक निलोत्पल, सहायक पोलिस निरीक्षक मुळूक आदी उपस्थित होते.
‘एसपी’ भादलीत…
भादली येथील प्रदीप सुरेश भोळे (वय 45), पत्नी संगीता सुरेश भोळे (वय 35), मुलगी दिव्या प्रदीप भोळे (वय 8), तर मुलगा चेतन प्रदीप भोळे (वय 5) यांचा खून झाल्याची घटना 20 मार्च रोजी उघडकीस आली. सर्व गाव गाढ झोपेत असताना भोळे कुटुंबियांचा निर्घृण खून करण्यात आला. दीड महिना उलटल्यानंतरही खूनाचे नेमके कारण कळू शकले नाही. संपूर्ण राज्याला हादरवणारी घटना 20 मार्च रोजी भादली घडली होती. त्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी शनिवारी जिल्हा पोलिस अधीक्षक कराळे यांनी भादलीला भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांशी तसेच प्रदीप भोळे यांच्या आजुबाजुला राहणार्यांशी चर्चा केली. तसेच प्रदीप भोळे ज्या ठिकाणी हॉटेल सुरू करणार होते. त्या ठिकाणीही एसपींनी भेट दिली.