भादली येथे नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

0

आईच्या उपचारासह बहिणीच्या शिक्षणाचा खर्चः नशिराबाद पोलिसात नोंद


जळगाव : जन्मानंतर 15 दिवसांची वडीलांचे निधन झालेल्या समज येताच बालकाने शालेय शिक्षण अपुर्ण सोडून मजुरी करीत कौटुंबिक जबाबदारी सांभाळली. दरम्यान, वाढत्या महागाईमुळे आता आईचा औषधोपचार व मोठ्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च न झेपावल्यामुळे नैराश्य आलेल्या सुशांत छोटूराम इंगळे (वय 19 रा. भादली) तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आई पोटाच्या आजाराने त्रस्त

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत याची आई उषाबाई ही पोटाच्या विकाराने ग्रस्त आहे. त्यांना दवाखान्यासाठी मोठा खर्च लागत आहे. तशाही परिस्थितीत आई दुसर्‍याच्या शेतात मजुरी करते तर बहिण पूजा ही देखील येवला, जि.नाशिक येथे नर्सिंगचा कोर्स करीत आहे. तिलाही शिक्षणासाठी खर्च लागत आहे. सुशांत पंधरा दिवसाचा असतानाच वडीलांचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सुशांतवर होती. ट्रॅक्टरवर मजुरीचे काम करुन मोठी कसरत होत होती. ना आईचे आजारपण ना बहिणीचा शिक्षणाचा खर्च पेलवू शकत त्यामुळे नैराश्यात आलेल्या सुशांतने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतची आई उषाबाई मंगळवारी गावातीलच राजेश पाटील यांच्या शेतात मजुरीच्या कामाला गेली होती. त्यामुळे सुशांत हा एकटाच घरी होता. दुपारी एक वाजता सुशांत हा गळफास घेतल्याच्या अवस्थेत शेजारच्या लोकांना दिसला.