जळगाव । सोमवारी मध्यरात्री भादली येथे एकाच कुटुंबातील चौघांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचा पोलिसांनी तपासचक्रे गतीमान करून शोधकार्य सुरू केले होते. काही लोकांची केलेली चौकशी तसेच गोपनीय रेकॉर्ड तपासणीच्या आधारातून पोलिसांनी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, तपास प्रगतीपथावर असून लवकरच गुन्हा उघडकीस येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
35 जणांची कसून चौकशी
प्रदीप सुरेश भोळे (वय 45), पत्नी संगिता भोळे (वय 35), मुलगी दिव्या (वय 6) व मुलगा चेतन (वय 4) या एकाच कुटूंबातील चार जणांची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली होती. अतिशय क्रूरपणे झालेल्या या हत्याकांडाने अख्खा जिल्हा हादरला आहे.दोन दिवसात पोलिसांनी 35 जणांची कसून चौकशी केली आहे. त्यातून दोन आरोपींपर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले आहे. एका आरोपीला मंगळवारी एमआयडीसीतील कंपनीतून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, घटना उघडकीस आल्यापासून पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, भुसावळचे सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल, अधिकारी मनीष कलवानिया आदी अधिकाजयांचा ताफा दोन दिवसापासून नशिराबादमध्ये ठाण मांडून आहे.
घटनास्थळाची पाहणी
पोलिसांनी मंगळवारी गुन्ह्याच्या तपासाला गती देत सकाळपासून पुन्हा शोधचक्रे गतीमान करण्यात आली. पोलीसअधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी आज पुन्हा तपासाला गती दिली. यातच नशिराबाद पोलीस स्टेशनचे एपीआय राहूल वाघ तसेच कर्मचारी या गुन्ह्याच्या चौकशीत कार्यरत होते. दुपारी अडीच वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसलेले होते. पोलीस टीमने पुन्हा भादली येथे घटनास्थळी पथकांनी भेट देऊन पाहणी केली.
आयजींनी घेतला आढावा
भादली हत्याकांडप्रकरणी गुन्ह्याच्याकामी पोलिसींग तपासकामाचा आढावा घेण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे आज सायंकाळी जळगाव येथे दाखल झाले. ते येथून तत्काळ भादली येथील घटनास्थळ गाठून तेथील संपूर्ण परिसराची पाहणी करत घटनेची माहिती घेतली. यानंतर नशिराबाद पोलीस स्टेशनला जाऊन आढावा घेतला अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यांच्यासमवेत पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर हे होते. दरम्यान प्रदीप भोळे यांनी तीन बिघे कोरडवाहू शेती घरबांधकाम व स्वत:ची हॉटेल सुरु करण्यासाठी गावातील महेश पाटील यांना सहा लाख रुपये बिघ्याने शेती विक्रीकेली होती. नंतर बयाना म्हणून पाटील यांनी भोळे यांना 50 हजार रुपयांचा धनादेश व रोख 35 हजार रुपये दिले होते.22 मार्च रोजी शेतीची पक्की खरेदी होणार होती व त्यांना 17 लाख रुपये मिळणार होते.