भाबडा आशावाद

0

पंतप्रधान ब्रिटनमधील मँचेस्टर शहरी अमेरिकी पॉप गायक आरियाना आंद्रेच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांनी अवघे ब्रिटन हादरले असून, त्याचे पडसाद जगभर उमटत आहेत. विशेषतः आयसिससारख्या संघटनेकडे याबाबत बोट दाखवले जाते आहे. दहशतवाद्यांचे नंदनवन असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ब्रिटन व अमेरिकेेने भारताला साथ द्यावी, अशी प्रतिक्रिया आपल्याकडे व्यक्त केली जात आहे. भाबडा आशावाद असेच त्याचे वर्णन करावे लागेल. असा आशावाद व्यक्त करणारे फक्त आपणच असतो असे नाही, तर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही त्याच माळकेत आहेत.

ब्रिटनला असे हल्ले नवे नाहीत. आयरिश रिपब्लिकन आर्मी (आयआरए) य आयरिश बंडखोरांच्या संघटनेने आयरिश स्वातंत्र्यासाठी शंभरहून अधिक वर्षे ब्रिटीश राजसत्तेशी झगडा केला. याच आयआरएने मँचेस्टरमध्येच सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी असाच स्फोट घडवून आणला होता. आताची स्थिती वेगळी आहे. इराक युद्धात ब्रिटनने अमेरिकेला दिलेली साथ हा पश्‍चिम आशियातील बंडखोर गटांच्या रागाचा विषय आहे. त्यातूनच आधी लादेनच्या अल कायदाच्या दहशतवाद्यांनी लंडनमध्ये स्फोट घडवून आणला होता. आयआरएचा संघर्ष व त्यातून निर्माण झालेले संकट वेगळे होते. ते सर्वस्वी राजकीय होते. आताचा संघर्ष असा राजकीय नाही. त्याला धर्म, अर्थ असे अधिक वेगळे पदर आहेत. गोरे व गौरेतर यांच्यातील संघर्षही यानिमित्ताने अवघ्या युरोपातच सुर झाला आहे. फ्रान्स किंवा युरोपात अन्य ठिकाणी सध्या होत असलेल्या हल्ल्यांमागे हेही कारण आहे. जागतिक मंदीच्या काळात सुरू असलेल्या या संघर्षाचे मूळ आर्थिक कारणांत दडले असले, तरी त्याला धर्म, वंश, भाषा, संस्कृती असे पदरही जोडले जात आहेत. ब्रिटनमधील ताजा हल्ला या पार्श्‍वभूमीवरचा आहे.

मँचेस्टरमधील या हल्ल्याचा आपणही निषेध केला. मात्र, त्याच वेळी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आता ब्रिटन, अमेरिका व भारताने एकत्र यावे, अशी आशाही आपल्याकडे व्यक्त केली गेली. त्यातून दिसून आली ती राजकीय अपरिपक्वताच. राष्ट्रहित हा कोणत्याही देशाच्या परराष्ट्र धोरणाचा गाभा असतो. पाकिस्तानला धडा शिकवणे ही आपली गरज आणि अत्यावश्यकताही आहे. परंतु, ब्रिटन किंवा अमेरिकेसाठी ती गरज नाही. पाकिस्तानचे भू- राजकीय आणि व्युहतंत्रात्मक दृष्ट्या असलेले स्थान अमेरिकेसाठी अधिक महत्त्वाचे आहे. पश्‍चिम, मध्य व दक्षिण आशियात अमेरिकेला आपला प्रभाव कायम राखण्यासाठी पाकिस्तान व अफगाणिस्तान हे देश अत्यंत महत्त्वाचे असल्याने अमेरिकी धोरणकर्ते अमेरिकेचे राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून धोरणे आखत असतात.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेही असेच स्वप्नाळू गृहस्थ. आपण म्हणू तसेच जग चालेल, अशी त्यांची धारणा असते. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी प्रथमच परदेश दौरा केला. तोही पश्‍चिम आशियाचा. ही घटना अत्यंत महत्त्वाची मानावी लागेल. पश्‍चिम आशियातील राजकारण कमालीचे गुंतागुंतीचे झाले आहे. याच गुंतागुंतीत ट्रम्प यांनी भरच घातली आहे. या दौर्‍यात ट्रम्प यांनी इस्लामिक कॉन्फरन्समध्ये केलेले भाषण त्यांच्या या स्वप्नाळू वृत्तीचे दर्शन घडवणारे ठरले. इस्लाम हा शांततेचा पुरस्कर्ता आहे, हे आपम जगाला दाखवून देऊ. तसे संस्कार पुढील पिढीवर करू. त्यासाठी आपण सगळे एकत्र येवून प्रयत्न करू, असे ते म्हणाले. म्हणजे नक्की काय करायचे? पश्‍चिम आशियातील अमेरिकेचा ओसरता प्रभाव कायम राखण्याचे आव्हान अमेरिकेपुढे आहे. आयसिससारख्या संघटनेचा पाडाव करायचा, तर सौदी, इराणसह सर्व आखाती देशांत आधी सामंजस्य निर्माण करावे लागेल. त्यासाठी अमेरिकेला आधी या प्रदेशात आपली निर्विवाद विश्‍वासार्हता सिद्ध करावी लागेल. ट्रम्प यांनी उल्लुमशाल भाषणांपलीकडे या दौर्‍यात फार काही ठोस केल्याचे दिसलेले नाही. इराणच्या अध्यक्षपदी हसन रुहानी यांची याच काळात फेरनिवड झाली. नेमस्त व मध्यममार्गी रुहानी यांनी ओबामा यांच्याबरोबर समेट करत अमेरिका- इराण संबंधांचा नवा अध्याय लिहिला. मात्र, ट्रम्प यांनी याच इराणवर दहशतवादाचा आरोप करत वातावरण पुन्हा पेटवण्याचा उद्योग केला. इराक, सीरियासह सारा पश्‍चिम आशिया पोळून निघत असताना ट्रम्प यांनी केलेले हे मतप्रदर्शन सर्वथा गैर होते. त्यातच पश्‍चिम आशियातील सत्तासंतुलन सौदीच करू शकतो, असे सूचवत आपल्यातील भाबडेपणाचाच प्रत्यय आणून दिला. इराक, सीरियातील पंथीय राजकारणात सौदी किती गुंतला आहे, याचे आपल्याच सीआयएकडील तपशील त्यांनी आधी पाहिले असते, तरी त्यांनी अशी भाषा वापरली नसती. हाच सौदी पाकिस्तानचा घट्ट मित्र असून, इराणविरोधात कारवायांसाठी पाकिस्तानला सातत्याने सढळ हस्ते मदत करत आला आहे. पश्‍चिम आशियातील राजकारणात अमेरिकेला आजही सौदीची गरज असल्याने अमेरिका सौदीला दुखावत नाही. अशा स्थितीत पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अमेरिका आपल्याला मदत करण्याची शक्यता नसल्याने उगाच भाबडी आशा करण्यात अर्थ नाही. पाकिस्तान आणि दहशतवादाविरुद्धची लढाई आपली आपल्यालाच लढावी लागणार आहे.