जळगाव। पती-पत्नीमध्ये सुरू असलेला कौटूंबिक वाद मिटविण्यासाठी गुरूवारी स्वत:ला नाशिक येथील डेप्यूटी कलेक्टर असल्याचा बतावणी करणार्या तोतया डेप्यूटी कलेक्टरचा पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी पर्दाफाश केला होता. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात त्याने शिर्डी तसेच सप्तश्रृंगी गडावर जावून तेथे तहसिलदार असल्याचे सांगून व्हीआयपी दर्शन घेतल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर भामट्याने चक्क आपल्या घरावर तहसिलदार अशी नेमप्लेट लावल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. या भामट्याने आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता आहे.
असा झाला तोतया डेप्यूटी कलेक्टरचा पर्दाफाश
समाधान केवलराव जगताप (वय 28, रा.प्लॉट नंबर 9, एस. गणेश मेसटोन जेलरोड, नाशिक) ज्योती धनंजय वाडिले (रा.अमळनेर) हे दोघे जळगावातील महिला दक्षता समिती येथे बांभोरी येथील मुलगा दादावाडी परिसरातील मुलगी या पती-पत्नीमध्ये सुरू असलेला कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गुरुवारी जळगावात आले होते. दरम्यान, या प्रकरणात मुलीवर अन्याय झाला असून तिच्या सासरच्या मंडळींवर कारवाई करा, असे सांगण्यासाठी समाधान याने थेट पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या मोबाइलवर फोन केला. आपण डेप्यूटी कलेक्टर जे. सिद्धांत’ बोलत असल्याचे त्याने सांगळे यांना सांगितले. यानंतर दुपारी सांगळेंच्या दालनात संबंधित मुलीसह तिच्या सासरची मंडळी आणि तोतया डेप्यूटी कलेक्टर जमा झाले. काही मिनिटे चर्चा केल्यानंतर जगताप हा अधिकारी नसल्याचे त्याच्या बोलण्यातून सांगळेंना जाणवले. यानंतर चर्चेत गुंडाळून त्याची संपूर्ण माहिती त्यांनी काढून घेतली यानंतर त्यांना हा तोतया डेप्युटी कलेक्टर असल्याचे कळताच त्यांनी सांगळे यांनी त्याला ’खाक्या’ दाखवताच काही क्षणातच त्याने आपले खरे नाव ओळख सांगितली.
शाळेला दिली भेट
पोलिस उपअधीक्षक सचिन सागंळे यांनी तसेच जिल्हा पेठ पोलिसांनी समाधान जगताव या तोतया ’डेप्यूटी कलेक्टरची कसून चौकशी केली असता त्याने नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील चौगाव जिल्हा परिषद शाळा येथे तहसिलदार असल्याचे बतावणी करत भेट दिल्याचे उघड झाले आहे. एवढेच नव्हे तर बहाद्दराने स्वत:च्या फेसबुक अकांऊटवरील प्रोफाईलवर शासकीय लोगो वापरून स्वत:ची माहिती महाराष्ट्र राज्याचा सनदी अधिकारी असल्याचे दाखवून शासकीय खात्याच्या खोट्या जाहिरातील अकाँऊटवर तयार केल्याचे पोलिस चौकशीत समोर आली आहे.
भामट्यावर दुचाकी चोरीचा गुन्हा
तोतया डेप्युटी कलेक्टर समाधान जगताप यांच्यावर नाशिक येथील भद्रकाली पोलिस ठाण्यात सन 2011 ते 2012 च्या दरम्यानात दुचाकीचा चोरीचा दाखल झाल आहेत. तर समाधान हा नाशिक येथे एका हॉटेलात कामाला होता मात्र, तेथे देखील फसवणुक केल्याने मालकाने त्याला कामावरून काढले होते. पुन्हा दुसर्या ठिकाणी हॉटेलात कामाला लागल्यावर त्याने पुन्हा हॉटेलमालकांची फसवणुक केल्याने त्याला तेथूनही काढण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली. समाधान याने स्वत:ला तहसिलदार सांगत शिर्डी येथील साई संस्थान येथे व्हीआयपी प्रवेश घेतले असून सप्तश्रृंगी गडावरही तहसिलदार असल्याचे सांगून व्हीआयपी दर्शन घेतल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.