भामरे । मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईदला मोजकेच दिवस बाकी आहेत. यामुळे त्यांची रमजान ईदच्या खरेदीसाठी बाजार पेठेत गर्दी होतांना दिसत आहे. बाजारात प्रत्येक वस्तूची दरवाढ झालेली दिसत असली तरी ईदनिमित्त खरेदी करणार्यांमध्ये उत्साह पहावयास मिळत आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी प्रार्थनास्थळ आणि घरांची देखील रंगरंगोटी करण्यावर भर देतांना दिसत आहेत. ईद सण गरिब असो की श्रीमंत सगळ्यांच्या घरात साजरा होतो. प्रत्येक जण नवे कपडे परिधान करीत असतात. यासाठी नवीन कपडे खरेदीसाठी कापड दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे. तर कापड घेऊन ट्रेलरकडून कपडे शिवणार्यांनी वेळेवर कपडे मिळावेत याकरिता नंबर लाऊन ठेवले आहेत.
तरूणांना मिळाला हंगामी रोजगार
ईद सणाला मुस्लिम समाजामध्ये विशेष महत्व आहे. ईदच्या येण्याने मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह पाहवयास मिळत असतो. या महिन्यात मुस्लिम समाजातील पुरूष, महिला, लहान मुले एक महिन्याचा उपवास (रोजा) करतात. रात्री तरावीहची नमाज पठण करतात. अशा या रमजान महिन्यांमध्ये गरीबांना दान करण्यात येते. यात अन्नदान, वस्त्रदान मोठ्याप्रमाणावर करण्यात येते. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा व अल्लाहची इबादत संपूर्ण महिनाभर करतात. ईदच्या दिवशी ईदगाह वर नमाज पठण केले जाते. मुस्लिम बांधवांची बाजारपेठेत चप्पल व सुका मेवा खरेदीसाठी गर्दी होत आहे. ईदनिमित्त उलढाल वाढल्याने व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तर काही तरूणांनी ईदनिमित्त किरकोळ विक्री सुरू केली आहे. यातून या तरूणांना हंगामी स्वरूपाचा रोजगार उपलब्ध झाला आहे.