तिढा सुटेपर्यंत काम बंद ठेवण्याचे आयुक्तांना निवेदन; दरमहा 60 लाखांचा फटका
पुणे : पूर्व पुण्याला पुरेसा पाणीपुरवठ्यासाठी भामा-आसखेड योजनेच्या जॅकवेलचे काम सुरू करण्यात आले. मात्र, विविध मागण्यांसाठी स्थानिकांनी हे काम बंद पाडले आहे. योजनेचे काम करणार्या ठेकेदारांनी भाडेकराराने आणलेले साहित्य प्रकल्पाच्या ठिकाणी पडून आहे. काम बंद असतानाही महापालिकेस खर्च द्यावा लागत आहे. त्यामुळे तिढा सुटेपर्यंत काम बंद ठेवण्याचे निवेदन या प्रकल्पाचे काम पाहणार्या विभागाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहे.
पूर्व भागासाठी भामा-आसखेड धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी काम सुरू आहे. त्यात वाकीतर्फे वाडा या गावात जॅकवेल बांधण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी प्रकल्पग्रस्तांनी हे काम अडविल्याने ते बंद होते. त्याचा परिणाम प्रकल्पाच्या खर्चावर पडत असल्याने तत्कालिन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन 1,700 मिमी व्यासाच्या जलवाहिनी तसेच जॅकवेलचे काम सुरू करण्यास प्रकल्पग्रस्तांनी मान्यता दिली होती. त्यानंतर पुन्हा दि. 22 मार्च ते 21 एप्रिलदरम्यान आपल्या मागण्यांसाठी या जॅकवेलचे काम आंदोलकांनी बंद पाडले होते. त्यावर काम बंद पाडल्यास आंदोलकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिल्याने हे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, 2 जुलैपासून हे काम ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा बंद केले आहे. त्यावर गेल्या दीड महिन्यात केवळ बैठका सुरू असून त्यावर अजून कोणताही तोडगा निघालेला नाही.
या योजनेचे काम बंद असल्याने पालिकेस दरमहा 60 लाखांचा फटका बसत आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत या प्रकल्पाचा खर्च जवळपास पावणेदोन कोटींनी वाढला आहे. जॅकवेलचे काम अंतिम टप्प्यात असल्याने काम करणार्या ठेकेदार कंपनीने यंत्रसामग्री प्रकल्पाच्या ठिकाणी आणली आहे. ही साधने भाडेकराराने असल्याने त्याचे भाडे अप्रत्यक्षपणे महापालिकेसच भरावे लागणार आहे. परिणामी गेल्या तीन महिन्यांपासून काम बंद असल्याने तसेच हा खर्च वाढत असल्याने कंपनीने तात्पुरते काम बंद करण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने याबाबतचे निवेदन आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.