भामा-आसखेडमध्ये 73 टक्के साठा

0

गतवर्षी 54.20 टक्के पाणीसाठा होता

पुणे : मागील हंगामात चांगला पाऊस झाला असल्याने भामा-आसखेड धरणात सध्या 72.95 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच महिन्यात 54.20 टक्के पाणीसाठा होता. सुमारे 1292 मिलिमीटर पाऊसामुळे विहिरी-नाल्यांची पातळी समाधानकारक आहे. त्यामुळे मार्चअखेर जवळ आला तरी पाणीटंचाई जाणवत नसल्याचे भामा-आसखेडचे शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी सांगितले. या धरणाची पाणी साठवण क्षमता 8.14 टीएमसी असून, धरणात सध्या 72.95 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

शेतीसाठी पाण्याचा विसर्ग
16 ते 18 नोव्हेंबर या तीन दिवसांत भामा आसखेड धरणातून 550 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते. 24 डिसेंबरला 783 वरून 860 क्युसेक्स सोडून 3 जानेवारी 18 ला बंद करण्यात आले. 31 जानेवारी 18 ला 845 क्युसेक्सने सोडून 2 फेब्रुवारीला बंद करण्यात आले. 20 फेब्रुवारीला 600 क्युसेक्स, 950 वरून 1000 क्युसेक्सने पाणी सोडून 3 मार्च 18 ला विसर्ग बंद करण्यात आला होता. असा चार वेळा विसर्ग करण्यात आला होता. वेळोवेळी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे त्याचा फायदा खेड तालुक्यासह शिरूर, दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावांना आणि विविध गावच्या पाणी योजनांना झाला तर झालाच, पण त्याबरोबरच नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्णपणे भरले. त्यामुळे 2-3 महिने नदीकाठच्या शेतकर्‍यांची शेतपिकाच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

खेडसह शिरूर व दौंडला फायदा
धरणाची सध्याची पाणीपातळी 667.37 मीटर इतकी आहे, तर पाणीसाठा 171.924 द.ल.घ.मी. व उपयुक्त पाणीसाठा 158.402 द.ल.घ.मी. इतका आहे. यंदा धरण वेळोवेळीच्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरल्याने बर्‍याचदा विसर्ग सोडावा लागला. पूर्ण भरल्यामुळे या पाण्याचा फायदा खेडसह शिरूर व दौंड या तीन तालुक्यांना होणार आहे. त्यामुळे हे धरण तीनही तालुक्यांतील शेतकरी व नागरिकांना वरदान ठरले आह. नदीकाठावरील गावांची तहान भागणार आहे.