भामा आसखेड प्रकल्पातील अडथळे दूर

0

ऑक्टोबरमध्ये काम होणार पूर्ण : 185 कोटींची तरतूद

पुणे :शहराच्या पूर्व भागातील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या भामा आसखेड प्रकल्पाचे काम येत्या ऑक्टोबरमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील लोकांना येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या प्रकल्पातून पाणी मिळेल. प्रकल्पाच्या कामासोबतच, सिंचन निधी आणि शेतकर्‍यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने महापालिकेच्या स्थायी समितीने सुमारे 185 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामातील अडथळे दूर झाले आहेत.

पूर्व भाग म्हणजे, खराडी, चंदननगर, विश्रांतवाडी, धानोरी, कळससह परिसरांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार 2014 मध्येच तो पूर्ण होऊन पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या मागणी आणि त्यावरून निर्माण झालेली राजकीय परिस्थिती, यामुळे प्रकल्पाच्या कामात अडथळे आले. राज्य सरकार, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे कानाडोळा केला. परिणामी, आंदोलनाचा पवित्रा घेत, शेतकर्‍यांनी अनेकदा काम रोखले.

प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यातील काम सुरू असले तरी, मागण्या मान्य होईपर्यंत पाणी सोडू देणार नाही, अशी शेतकर्‍यांची भूमिका आहे. त्यातच, शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता, महापालिकेच्या अर्थसंकल्पात 185 कोटींची तरतूद करीत, प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. या निधीतून शेतकर्‍यांच्या मागण्याही मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी स्पष्ट केले.