धुळे (योगेश जाधव) । भामेर येथील किल्ला भारतीय पुरातत्व विभागाकडे सीमांकन करून देण्यासाठी प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने भामेर किल्ल्याची नुकतीच पाहणी केली.या समितीमध्ये तहसीलदार संदिप भोसले,पुरातत्व विभागाचे अभियंता रिषिव श्रीवास्तव,तालुका निरीक्षक भूमी अभिलेख,वन विभागाचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांचा समावेश होता.यावेळी पुर्ण किल्ल्याची पाहणी करून या संपूर्ण गटाची मोजणी करण्याचे निश्चित करण्यात आले.तदनंतर सीमांकन करून या किल्ल्याच्या सभोवती संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे.हा किल्ला भारतीय पुरातत्व विभागाकडे इ.स.1914 साली अधिसूचना काढून संरक्षित करण्यात आला.धुळे जिल्ह्यात असणार्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात सुंदर किल्ला म्हणजे भामगिरी अथवा भामेर. एकेकाळी अहीर राजांची राजधानी असलेला हा किल्ला, भामेर गावाभोवती नालेच्या आकारात (इंग्रजी यु आकारात) पसरलेला आहे. या किल्ल्याने गावाला तीन बाजूंनी कवेत घेतल्यामुळे गावाला नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे. उरलेल्या चौथ्या बाजूला तटबंदी व प्रवेशद्वार बांधून, त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी गावाला पूर्ण संरक्षित केले आहे. असा हा नितांत सुंदर किल्ला (आणि गाव) प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच पाहिजे असा आहे.
भद्रेश्वराचं जीर्णोध्दार केलेलं टुमदार मंदिर
डोंगरांना वळसा घालून आपण भामेर गावात प्रवेश करतो, आपल्या डाव्या बाजूस 20 फूट उंच प्रवेशद्वार आपले स्वागत करते या प्रवेशद्वाराच्या खांबावर नक्षी कोरलेली आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूला विहीर आहे विहीरीचे पाणी पोहर्याने काढून चरांमधून हौदात खेळवलेले आहे. त्याकाळी या हौदातील पाण्याचा उपयोग वाटसरुंची तहान भागवण्याकरीता होत असावा.पूर्वेला किल्ल्याकडे जाताना मध्येच भद्रेश्वराचं जीर्णोध्दार केलेलं मस्त टुमदार मंदिर लागतं अन् तटबंदीचे अवशेषही दिसतात. वैभवशाली इतिहास काळात हे गाव दगडी बांधकामाने तसे चौफेर तटबंदीने संरक्षित असल्याच्या या खुणाच म्हणाव्या लागतील. पुढे मध्य-उजवीकडच्या डोंगराच्या बेचक्यात किल्याचं प्रवेशद्वार आहे.ढासळत्या बुरुजालगत असलेल्या प्रवेशद्वारातून आपण किल्ल्यावर निघतो. एकूण 60 पायर्या चढून गेल्यानंतर किल्ल्याचा खरा आवाका लक्षात येतो.पुन्हा 15 पायर्यांनंतर दुसरे प्रवेशद्वार लागते. मग लक्षात येते की हा किल्ला या तीन डोंगरांनी तयार झाला आहे. अगदी उजव्या म्हणजे दक्षिण बाजूच्या पहिल्या डोंगरावर पीरबाबाचं स्थान आहे. त्याचं शुभ्र रंगाचं बांधकाम अगदी मंदिरासारखं जाणवतं.
धुळ्यापासून 50 कि.मी. अंतरावर
बैल पोळ्याच्या दुसर्या दिवशी गडावर यात्रा भरते.भामेर गावाचा इतिहास अतिप्राचीन आहे. प्राचिन काळी येथे भद्रवती नगर होते, तेथे युवनाश्व नावाचा राजा राज्य करीत होता. त्याची मुलगी भद्रावती हिच्या नावाचा अपभ्रंश म्हणजे भामेर होय.धुळ्यापासून 50 कि.मी. अंतरावर असलेला हा अभीरकालीन किल्ला, भामेर (भामगिरी) 1000 ते 1500 वर्षांपासून आपला ऐतिहासिक समृद्ध वारसा आजही टिकवून आहे. दंतकथेप्रमाणे तोरणमाळचा महाभारतकालीन राजा युवनाश्न हा पावसाळ्यात येथे वास्तव्य करून राहत होता. त्याची उपराजधानी भामेर येथे होती.प्राचीनकाळी सुरत बुर्हाणपूर मार्गावरील वैभवशाली व संपन्न शहर म्हणून भामेर ओळखले जाई. नाशिकला जाणारा व्यापारीमार्गही या शहरावरुन जात असे.अहिर घराण्याच्या ताब्यात हा किल्ला काही काळ होता. किल्ल्यावरील 184 लेणी (गुंफा) याच काळात खोदल्या गेल्या असाव्यात. आजही स्थानिक लोक या गुफांना अहिर राजाची घरे म्हणून ओळखतात.पहाण्याची ठिकाणे-आपण धुळे – सुरत रस्त्यावरुन जसजसे भामेर कडे येऊ लागतो, तसतसे आपल्याला भामेर किल्ल्याच्या 3 डोंगरापैकी एका डोंगरावर एकाच ठराविक उंचीवर कोरलेली लेणी दिसायला लागतात.
दळणवळणाच्या मार्गावरील केंद्रस्थानी
तिथे जाण्यासाठीही सुरेख कातळकोरीव पायर्या आहेत. तिथून उत्तर-पूर्वेला भामेरचं विहंगम फारचं मनमोहक दिसतं.मध्ययुगात हा किल्ला व्यापारी दळणवळणाच्या मार्गावरील प्रमुख केंद्रस्थानी होता. भामेर किल्ल्यापासून एक मार्ग धुळ्यास पुढे नागपूर असा, एक मार्ग सुरत-भडोच, एक मार्ग नंदुरबार असा जातो. प्राचीन काळापासून या व्यापारी मार्गावरच (साईवाह पथ) लेण्या कोरल्या गेल्यात. येथे जैन लेण्या आजही प्राचीन ऐतिहासिक कलेचा वारसा टिकवून आहेत. यादवकालीन लक्ष्मीदेव या राज्याचे राज्य या भागावर होते. तसा शिलालेख आजही येथे गतस्मृतीचा उजाळा देत आहे. या किल्ल्यातील पाण्याचे नियोजन अभ्यासण्यासारखे आहे. आजही येथे 184 पाण्याच्या टाक्या डोंगराच्या कडेकपारीत कोरलेल्या आहेत. गत संस्कृतीच्या पाऊलखुणा, भग्न, भव्य दरवाजे, कोरीव खांब, उद्ध्वस्त वाडे वैभवशाली ऐतिहासिक वारशाची आठवण करून देतात….