भायखळा कारागृहात मंजूळा शेट्ये कोठडीतील मृत्यूप्रकरण

0

मुंबई – जन्मठेपेच्या गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेल्या मंंजूळा ऊर्फ मंजू गोविंद शेट्ये या कैदी महिलच्या हत्येप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या कारागृह अधिकार्‍यासह पाच महिला रक्षकाना येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. या सहाही महिला आरोपींना आज सायंकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांच्या पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान निलंबित आमदार रमेश कदम यांनी सहाही आरोपींनी आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशावरुन हत्येचा पुरावा नष्ट केल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली होती. या सहाजणींमध्ये कारागृह अधिकारी मनिषा गुलाब पोखरकर, महिला रक्षक बिंदू बाळकृष्ण नाईकोडे, वसीमा युसूफ शेख, शीतल वसंत शेगावकर ऊर्फ शेगोकार, सुरेखा गोरखनाथ गुलवे ऊर्फ सुलेखा प्रसाद काकड आणि आरती दिपक शिंगणे यांचा समावेश होता. कारागृहातील संबंधित सहाही अधिकारी आणि रक्षकांनी 23 जूनला जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या मंजू शेट्ये हिला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. 28 जूनला हा नागपाडा पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच या सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून ते सर्वजणी पोलीस कोठडीत होत्या. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना पोलीस बंदोबस्तात येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांची 28 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान आमदार रमेश कदम यांनी संबंधित आरोपींविरुद्ध पुरावा नष्ट केल्याचा आरोप केला आहे. याकामी त्यांना पोलीस महानिरीक्षक स्वाती साठे आणि अधिक्षक चंद्रमणी इंदुरकर यांनी मदत केल्याने त्यांच्याविरुद्ध 120 ब, 34 कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. मंजुळा शेट्टीला मारहाण करताना काही महिला कैद्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता, यावेळी या महिला कैद्यांनाही अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. हत्येच्या गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेल्या गुलाब यादव, चंद्रप्रकाश यादव, सुभाष यादवमंडल या चौघांना बॅरेक बाहेर काढून पुरावा नष्ट करण्यात आले होते. हा प्रकार तेथील सीसीटिव्ही कैद झाला आहे. मारहाणीतील सर्व वस्तू स्वयंपाकघरात लपवून ठेवण्यात आले होते. तिथे पोलिसांना मंजुळाची साडी सापडली, मात्र काठी सापडली नाही. ही काठी त्यांनी कचर्‍यात फेंकून दिल्याचाही आरोप आहे. या संपूर्ण घटनेची सध्या गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून आलेल्या माहितीनंतर संबंधितांवर कारवाईची शक्यता आहे. दरम्यान आमदार रमेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात स्वाती साठे आणि चंद्रमणी इंदुरकर यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना या गुन्ह्यांत अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.