भायखळा प्रकरणी दोषी सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई

0

मुंबई : भायखळा तुरुंगातील कैदी आणि वॉर्डन म्हणून कार्यरत असलेल्या मंजुळा शेटये यांच्या मृत्यूचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात तपासाअंती जेवढे अधिकारी दोषी आढळतील तेवढ्यांवर कारवाई केली जाईल, असे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या प्रकरणात मृतक मंजुळा यांचा शवविच्छेदन रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेला नाही असे विचारला असता लवकरच रिपोर्ट प्राप्त होईल त्यांनतर तपासाची दिशा अजून स्पष्ट होईल, असे पाटील म्हणाले. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. सएव संबंधितांचे स्टेटमेंट घेणे सुरू आहे. जवळपास 200 लोकांचे स्टेटमेंट घेतले गेले आहेत अशी माहिती पाटील यांनी दिली.

या प्रकरणात योग्य वेळी योग्य काळजी का घेतली नाही? याची चौकशी देखील केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तुरुंगातल्या सीसीटीव्ही फुटेज आणि व्यवस्थेवर प्रश्न विचारला असता सीसीटीव्हीमुळेच ही घटना कळली असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात पीएम रिपोर्ट आल्यावर सगळं सत्य समोर येईल असे सांगत आतापर्यंत आढळलेल्या दोषींवर 302 अंतर्गत गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.

इंद्राणी मुखर्जीला चौकशीवेळी मारहाण झाली का? या मागचे सत्य देखील चौकशी अंती समोर येईल, असे ते म्हणाले. इंद्राणी मुखर्जीने चौकशी दरम्यान मारहाण आणि धमकवल्याचा आरोप केला होता. या संपूर्ण प्रकरणात जे अधिकारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी आढळतील त्यांच्यावर जबाबदार म्हणून कारवाई करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.