मुंबई – भायखळा येथील अपघातात रोशनकुमार राजू साव नावाचा एक सात वर्षांचा मुलगा जखमी झाला. अपघातानंतर स्कूटरचालकाने तेथून पळ काढला. याप्रकरणी चालकाविरुद्ध भायखळा पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. हा अपघात काल दुपारी पाऊणच्या घोडपदेव येथील रामभाऊ भोगले मार्गावरील हाजी कासम चौकीजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रिंकूदेवी ही महिला माझगाव येथील हरियाना स्टिल कंपनी रोडवर राहते.
काल दुपारी ती तिच्या सात वर्षांचा मुलगा रोशनकुमारसोबत हाजी कासम पोलीस चौकीसमोरुन जात होती. यावेळी भरवेगात समोरुन येणार्या एका स्कूटरने रोशनकुमारला जोरात धडक दिली. त्यात तो जखमी झाला होता. जखमी झालेल्या रोशनकुमारला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी पळून गेलेल्या स्कूटरचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.