मुंबई । भायखळा येथील ‘राणीची बाग’ मधील मुख्य आकर्षण असलेले पेंग्विन पक्षी तसेच इतर वन्य प्राणी पाहण्यासाठी, उद्यानात फेरफटका मारण्यासाठी पर्यटकांची होणारी रोजची गर्दी यांच्यावर ‘करडी पाळत’ ठेवण्यासाठी तसेच त्यांना सूचना देण्यासाठी पालिकेचा यांत्रिकी, आणि विद्युत विभाग लवकरच या उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात सीसीटीव्ही आणि उद्घोषणा प्रणाली बसवणार आहे. यासाठी पालिका सुमारे सव्वा पाच कोटी खर्च करणार असून, याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणा-या स्थायी समितीच्या सोत संमतीसाठी मांडण्यात आला आहे. मुंबईमधील हे प्राणिसंग्रहालय सध्या नूतनीकरणाच्या टप्प्यात असून, हा त्याचाच एक भाग आहे.
चार कंपन्यांनी प्रतिसाद देत दाखल केल्या निविदा
मुंबई शहर आणि आजूबाजूचे जिल्हे व अन्य राज्यांमधील पर्यटक मोठ्या संख्येने या ‘राणीची बाग’ पाहण्यासाठी भेट देतात. या प्राणिसंग्रहालयाच्या विशाल परिसरात चोरी, अफरातफर, गैरप्रकार, अपघात व अन्य प्रकारचे गुन्हे व प्राणघातक हल्ले अशा प्रकरणे उद्भवू शकतात म्हणूून तेथे शिस्तबद्ध निरीक्षणाची आवश्यकता आहे. मुंबई पालिकेच्या या विस्तीर्ण क्षेत्राावर पाळत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि सार्वजनिक उद्घघोषणा व त्यासोबत डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर बसवण्यात येणार आहे. ही यंत्रणा उभारण्यासाठी यांत्रिकी आणि विद्युत विभागाने एकूण सात कोटी 42 लाख 83 हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आणि या कामांसाठी ‘ई निविदा’ मागवण्यात आल्या. त्याला या क्षेत्रातील चार अनुभवी कंपन्यांनी प्रतिसाद देत निविदा दाखल केल्या.
मे. कॉमटेक टेलिसोल्युशन्स कंपनीची शिफारस
यापैकी ‘मे. कॉमटेक टेलिसोल्युशन्स प्रा. लि’ या कंपनीने भरलेल्या पाच कोटी 64 लाख 63 हजार 766 रुपयांच्या निविदेची यांत्रिकी आणि विद्युत विभागाने शिफारस केली आहे. ही कंपनी कॅमेरा काढणे व परत जोडण्यासह अन्य तांत्रिक कामे करणार आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी यांत्रिकी आणि विद्युत विभागाने पाच कोटी 17 लाख 66 हजार 572 रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला आहे.