मुंबई । दादर येथील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. आगामी तीन वर्षांत या स्मारकाचे संपूर्ण काम पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानपरिषदेत आमदार शरद रणपिसे, जनार्दन चांदुरकर यांनी लक्षवेधी उपस्थित केली. त्यास उत्तर देतांना मुख्यमंत्री यांनी ही माहिती दिली. दोन वर्षांत दिसणारी सर्व मोठी तर एका वर्षात लहानसहान कामे होणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
लोकांमध्ये संभ्रमावस्ता
स्मारकाच्या बांधकामासाठी 425 कोटीची तरतूद करण्यात आली होती मात्र स्मारक उभारण्यात विलंब होत असल्याने याची किंमत वाढली असून आज सद्यस्थितीत 623 कोटींची आवश्यकता भासनार आहे. कामास विलंब होत असल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायिंमध्ये संभ्रमवस्ता निर्माण झाली आहे. शासनाने त्वरित स्मारक पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
महापुरुषांमध्ये तुलना नको
तांत्रिक कारणामुळे स्मारक उभारणीस विलंब होत असले तरी कामकजास वेग मिळणार आहे. स्मारकाला 700 नाही तर 7 हजार कोटी जरी लागले तरी स्मारक पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्री यांनी दिला. आमदार प्रकाश गजभीये यांनी शिवस्मारक, सरदार पटेल स्मारकाच्या तुलनेत आंबेडकर स्मारकासाठी कमी निधीची तरतूद केल्याचा प्रश्न उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवस्मारक व पटेल स्मारक हे पाण्यात असल्याने निधी लागत असल्याचे सांगितले तसेच महापुरुषामधे तुलना करू नका असे आवाहन ही केले.
स्मारकासाठी तब्बल तीनशे वर्ष टिकणारे स्टिल
स्मारकासाठी तब्बल तीनशे वर्ष टिकू शकतील असे स्टीलचे धातू साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून, कामकाज सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. 5 डिसेंबर 2013 रोजी केंद्र शासनाने स्मारक उभारण्याचे जाहीर केले. त्यानंतर पंतप्रधान यांच्या हस्ते 11 ऑक्टोबर 2015 रोजी स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. मात्र स्मारक पूर्ण झालेले नसल्याने विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला.