भारताकडून श्रीलंकेला व्हाईटवॉश

0

नवी दिल्ली-भारताच्या १९ वर्षाखालील संघाने श्रीलंकेत सुरु असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पूर्णपणे आपला वरचष्मा राखला आहे. दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले आहे. दुसऱ्या कसोटीतही श्रीलंकेवर १ डाव १४७ धावांनी मात केली. या विजयासह भारताने २ सामन्यांच्या मालिकेत यजमान श्रीलंकेला व्हाईटवॉश दिला आहे.

भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा होता. मात्र दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये मिळून अर्जुनला केवळ २ विकेट काढता आल्या. भारताकडून फलंदाजीमध्ये पहिल्या डावात अथर्व तायडेने १७७ तर पवन शहाने २८२ धावांची भक्कम खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ६१३ धावांचा डोंगर उभा केला होता. भारताच्या या धावसंख्येला पाठलाग करतांना श्रीलंकन संघाला मोठी कसरत करावी लागली मात्र तरीही विजय मिळविता आला नाही.

पहिल्या डावात आघाडीची फळी झटपट माघारी परतल्यामुळे लंकेचा संघ लगेच माघारी परततो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र मधल्या फळीत पी. सुर्यबंदरा, जी. दिनुशा आणि संदम मेंडीसच्या खेळीमुळे लंकेने ३०० धावांचा टप्पा ओलांडला. सुर्यबंदराने ११५ धावांची शतकी खेळी केली. मात्र ही जोडी माघारी परतल्यानंतर लंकेचा डाव ३१६ धावांत आटोपला.

फॉलोऑन घेऊन फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची दुसऱ्या डावातही फारशी चांगली सुरुवात झाली नाही. आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळणाऱ्या सिद्धार्थ देसाईने ४ बळी घेत लंकेच्या डावाला खिंडार पाडलं. अर्जुन तेंडुलकरनेही दुसऱ्या डावात कमिल मिशाराचा अडसर दूर केला. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर दुसऱ्या डावात श्रीलंकेचा डाव अवघ्या १५० धावांमध्ये आटोपला. या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.