नवी दिल्ली : डोकलाममध्ये चीनसोबत निर्माण झालेली युद्धजन्यस्थिती, दुसरीकडे काश्मीरमध्ये पाकिस्तानने सीमारेषेवर सुरु केलेला गोळीबार या बाबी पाहाता, उद्या चीन किंवा पाकिस्तानशी युद्ध छेडले गेल्यास भारताकडे केवळ 10 दिवस पुरेल इतकाच दारुगोळा असल्याची धक्कादायक बाब नियंत्रक व महालेखा परीक्षक (कॅग)च्या अहवालात नमूद आहे. त्यामुळे भारतीयांची काळजी वाढली आहे. या अहवालात नमूद आहे, की भारतीय लष्कराकडे केवळ 10 दिवसांचाच ऑपरेशनल वॉर रिझर्व्ह आहे. जेव्हा की तो किमान 40 दिवसांचा असावा लागतो. लष्कराने तो घटवून 20 दिवसांचा केला होता. शुक्रवारी हा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवण्यात आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
दारुगोळा खरेदी, साठवणुकीबाबत बेफिकीरी!
भारत व चीन यांच्यामध्ये दीर्घकाळ युद्ध चालले तर भारताला पुन्हा एकदा पऱाभवाचा सामना करावा लागू शकतो. कॅगच्या अहवालात लष्कराच्या शस्त्रसज्जतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे. या अहवालानुसार, भारतीय लष्कराला सलग दहा दिवस युद्ध करावे लागले तर त्यांच्याकडील राखीव दारुगोळा संपुष्टात येईल. 2009 ते 2013 या वर्षाच्या काळात जो दारुगोळा खरेदी करणे गरजेचे होते, त्याबाबत परीक्षण अहवालात ठपका ठेवण्यात आलेला आहे. यापैकी बहुतांश खरेदी व्यवहार 2017 पर्यंत प्रलंबित आहेत. ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड (ओएफबी)च्या कामकाजावर कॅगने याबाबत तीव्र शब्दांत ठपका ठेवला आहे. 2013 पासून दारुगोळ्याचे प्रमाण, त्यांची गुणवत्ता याबाबत ओएफबीने कधीही लक्ष दिले नाही. तसेच, दारुगोळा निर्मितीबाबतही हे बोर्ड बेफिकिर राहिले, असे या अहवालात नमूद आहे. हा अहवाल आता संसदेच्या पटलावर ठेवण्यात आल्याने केंद्र सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.
युद्धसज्जतेत भारत कमकुवत..
दारुगोळा साठ्यांना लागलेल्या आगी, अत्याधुनिक उपकरणांची कमतरता याबाबत जानेवारीमध्ये झालेल्या पाठपुरावा परीक्षणातही मोठे आक्षेप नोंदविण्यात आले होते. युद्धाची संभाव्य शक्यता गृहीत धरता भारतीय लष्कर आपला दारुगोळा सज्ज ठेवत असते. त्याला ऑपरेशनल वॉर रिझर्व्ह असे म्हणतात. संरक्षण मंत्रालयाने अशा प्रकारच्या राखीव दारुगोळ्यासाठी 40 दिवस पुरेल इतका असावा, अशी मंजुरी दिली आहे. 1999 मध्ये लष्कराने हा साठा 40 दिवसांहून 20 दिवसांचा असावा असा निर्णय घेतला होता. सप्टेंबर 2016 मध्ये पाहणी केली असताना, 40 दिवसांच्या दारुगोळ्यापैकी केवळ 20 दिवसांचा दारुगोळाच चांगला असल्याचे दिसून आले. तर 55 टक्के दारुगोळा चांगला नसल्याचेही दिसून आले. सद्या तर युद्धकाळात केवळ 10 दिवस पुरेल इतकाच दारुगोळा साठा असल्याची धक्कादायक बाब कॅगच्या अहवालात चव्हाट्यावर आल्यानंतर भारताची युद्धसज्जता उघडकीस आली आहे.