भारताकडे 2600 अण्वस्त्रे बनवण्याची क्षमता

0

इस्लामाबाद । कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून सणसणीत चपराक मिळालेल्या पाकिस्तानने आता अण्वस्त्र कार्यक्रमांवरून भारतावर आरोप केला आहे. जगामध्ये भारताचा अण्वस्त्र कार्यक्रम वेगाने विकसित होत असून, भारताकडे 2600 अण्वस्त्रांची निर्मिती करण्याची क्षमता आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नाफीस झाकारीया म्हणाले.

इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला. भारताच्या अण्वस्त्र संपन्नतेच्या महत्त्वकांक्षेमुळे दक्षिण आशियाच्या स्थैर्याला धोका असल्याचे त्यांनी सांगितले. भारताला नागरी अणुऊर्जा कार्यक्रमांतर्गत अणू इंधन, उपकरणे आणि जे तंत्रज्ञान मिळतेय त्याचा गैरवापर होण्याची भीती पाकिस्तानने व्यक्त केली आहे. भारताला अणू पुरवठादार देश एनएसजी गटाचे कायमस्वरूपी सदस्यत्व हवे आहे त्यावरही पाकिस्तानला आक्षेप आहे.

एलिट गटामध्ये भारताला सदस्यत्व दिल्यामुळे जे धोके निर्माण होऊ शकतात त्याचा जागतिक समुदायाने विचार करावा असे नाफीस झाकारीया म्हणाले. काही दिवसांपूर्वी भारताने अण्वस्त्रांचा पहिला वापर न करण्याच्या आपल्या धोरणाचा फेरविचार करण्याचे संकेत दिले होते. पाकिस्तानकडून वापर होऊ शकतो असे वाटले, तरच भारत पहिला अण्वस्त्रांचा वापर करेल असे संकेत भारताने दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तानने आता अशा स्वरूपाचे विधान केले आहे.

वास्तवात पाकिस्ताननेच अण्वस्त्रांच्या निर्मितीवर सर्वाधिक भर दिल्याचे अनेकदा समोर आले आहे. अमेरिकेतील अनेक संस्थांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे अहवाल प्रसिद्ध करून पाकिस्तानच्या नापाक कृती जगासमोर आणल्या आहेत.