पुणे । भारताचा इतिहास इंदिराजी गाधींशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी देशासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांनी सिक्कीम देश भारतात विलीन केला. 1971 मध्ये पाकिस्तान सैन्याच्या अत्याचारामुळे बांगलादेशी शरणार्थी म्हणून भारतात आले. या प्रश्नांचा तोडगा काढण्यासाठी इंदिराजींनी प्रयत्न केले. परंतु पाकिस्तानच्या हट्टीपणामुळे त्यांना भारतीय सैन्य बांगला देशात पाठवून युध्द करावे लागले. अवघ्या 13 दिवसात पाकिस्तानचे लष्कर अधिकारी लेफ्टनंट जनरल नियाझी यांनी आपल्या 90 हजार सैन्याबरोबर भारतीय सैन्याचे लष्कर अधिकारी लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरा यांच्यापुढे शरणागती घेतली, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी सांगितले.
भारतरत्न स्व. इंदिराजी गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी औंध येथील पं. भीमसेन जोशी कलादालनात प्रियदर्शनी इंदिराजींच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मोहन प्रकाश यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांनी केले. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, कैलास गायकवाड, नीता रजपूत, रमेश अय्यर, आनंद छाजेड, राजेंद्र भुतडा, विजय खळदकर, शानी नौशाद, महेश गायकवाड, रणजित गायकवाड व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
देश मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे
पंतप्रधान झाल्यावर इंदिरा गांधी यांनी अत्यंत निर्भिडपणे संस्थानिकांचे तन्खे बंद केले आणि सामान्य नागरिक, शेतकरी यांना बँकेतून कर्ज मिळण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयकरण केले. पं. जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्त महासंघाचे नेतृत्व केले. इंदिराजींनी त्या अलिप्त महासंघाच्या सर्व नेत्यांबरोबर चांगले संबंध ठेवले. आज या छायाचित्र प्रदर्शनात इंदिराजींच्या जीवनातील अनेक दुर्मिळ चित्र पाहण्यास मिळाली. त्यांनी देशासाठी केलेला त्याग लक्षात घेऊन आजच्या पिढीने भारत देश मजबूत करण्याचे काम करावे, असे मोहन प्रकाश यांनी सांगितले.
…म्हणूनच देश प्रगतीपथावर
इंदिरा गांधी यांनी आपले वडिल पं. जवाहरलाल नेहरू यांच्या बरोबर अनेक स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये भाग घेतला. लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर त्यांनी देशाची धुरा सांभाळली. गोरगरीब, दलित व वंचित वर्गासाठी त्यांनी अनेक योजना राबविल्या. त्यांनी गरीबी हटावचा नारा दिला. त्यांच्या 20 कलमी कार्यक्रमामुळे आज देश प्रगतीपथावर आहे, असे मोहन प्रकाश यांनी पुढे सांगितले.