नवी दिल्ली – देशात करोनामुळे आलेल्या मंदीमुळे सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांचे सर्वाधिक नुकसान होणार आहे. यामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली असून जीडीपीचा वृद्धीदर कधी नव्हे इतका खाली येईल, असे भाकित फिच रेटिंग्जने वर्तवले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ चा जीडीपी वृद्धीदर २ टक्के राहील, यामुळे अर्थव्यवस्था ३० वर्षे मागे जाईल, असेही फिच रेटिंग्जचे म्हणणे आहे.
आशियाई विकास बँकेनेही चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासदर गटवून तो ४ टक्के राहील, असे म्हटले आहे. एसअॅण्ड पी ग्लोबल रेटिंग्जनेही जीडीपी ३.५ टक्क्यांवर येईल, असे म्हटले आहे. यापूर्वी जीडीपी ५.२ टक्के राहील, असे भाकित या संस्थेने केले होते. इंडिया रेटिंग्जनेही भारताचा जीडीपी ५.५ टक्क्यांवरवरून खाली आणत ३.६ टक्के राहील, असे सांगितले आहे. मूडीजने गेल्याच आठवड्यात चालू २०२० या वर्षासाठी भारताचा जीडीपी वृद्धीदर ५.३ वरून २.५ टक्के केला होता. फिचच्या अंदाजानुसार, जागतिक स्तरावर आर्थिक उलाढाल १.९ टक्क्यांनी कमी होईल.