ओव्हल । महत्वाच्या सामन्यांमध्ये भारताकडून नेहमी सपाटून मार खाणार्या पाकिस्तानच्या संघाने आज चँपियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात याचे चांगलेच उट्टे काढले. पाकने भारताचा 180 धावांनी दारूण पराभव करून चँपियन्स ट्रॉफीवर कब्जा केला. भारताने नेणेफेक जिंकून पाकला पहिल्यांदा फलंदाजी देण्याचा निर्णय चांगलाच अंगलट आला. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये तब्बल 339 धावांचं आव्हान ठेवले. यात सलामीवीर फखर जमानने शानदार शतक झळकावले तर त्याला अझर अली, बाबर आझम, मोहंमद हाफीज यांनी समर्थ साथ दिली. या डोंगराएवढ्या आव्हानाला सामोरे जातांना भारताची सुरवातच धक्कादायक झाली. पहिल्याच चेंडूवर रोहित शर्मा पायचीत झाल्यानंतर भारतीय संघ जो गलीतगात्र झाला तो अखेरपर्यंत सावरू शकला नाही. हार्दीक पांड्या याने अवघ्या 43 चेंडूंमध्ये जोरदार फटकेबाजी करत 76 धावा काढून भारताच्या आशा पल्लवीत केल्या. मात्र अन्य खेळाडूंनी साथ न दिल्यामुळे भारताचा डाव 158 धावांमध्ये संपुष्टात आला. परिणामी भारताचा 180 धावांनी दारूण पराभव झाला.
पाकची तडाखेबंद फलंदाजी
चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम सामना केनिंग्टन ओव्हलच्या मैदानावर नेहमी चुरस असणार्या भारत व पाकिस्तान संघात रंगला. प्रथम नाणेफेक जिकून भारताने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेवून पाकिस्तानला फलंदाजीला निमंत्रण दिले.पाकिस्तानची सुरवात जोमदार झाली आणि भारताच्या गोलंदाजीचे त्यांनी पिसे काढायला सुरवात केली.आणि भारतासमोर विजयासाठी 339 धावांचे भलेमोठे लक्ष्य ठेवले.फखर जमानने (114) भारताविरुद्ध आपले पहिले शतक साजरे केले त्यानंतर पंड्या च्या गोलंदाजीचा शिकार झाला.
स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 4 जूनला पाकिस्तानविरुद्ध झाला. यात भारताने पाकिस्तानवर 124 धावांनी मात केली होती. मात्र पाकने अंतिम सामन्यात याचा वचपा काढत विजेतेपद पटकावले.
पांड्यांची एकाकी झुंज
भारतीय फलंदाजांनी आजच्या सामन्यात अक्षरश: हाराकिरी केली. पहिल्या चेंडूवर रोहित शर्मा परतल्यानंतर विराट कोहली, शिखर धवन, युवराज सिंग, धोनी, रवींद्र जडेजा व केदार जाधव यांनी फक्त हजेरी लावण्याचे काम केले. हार्दीक पांड्या याने मात्र एका बाजूने जोरदार फडकेबाजी केली. त्याने सहा षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 43 चेंडूंमध्ये 76 धावा चोपल्या. मात्र तो धावबाद झाल्यानंतर भारताच्या पराभवाची फक्त औपचारिकता उरली. पाकतर्फे मोहंमद आमीर आणि हसन अली यांनी प्रत्येकी दोन गडी तर शादाब खानने दोन गडी बाद केले.