भारताचा पराभव;मितालीची सर्वोत्तम खेळी

0
कातूनायके (श्रीलंका) : भारताची कॅप्टन मिताली राजने वन-डेतील नाबाद १२५ अशी सर्वोत्तम खेळी केली खरी; पण तिच्या या खेळीनंतर गोलंदाजांना श्रीलंकेच्या फलंदाजांना रोखण्यात अपयश आले. त्यामुळे भारतीय महिलांना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात तीन विकेटनी पराभव पत्करावा लागला. भारताने ५ बाद २५३ धावा केल्या. श्रीलंकेने चामरी अटापट्टूच्या शतकाच्या जोरावर विजयी लक्ष्य ४९.५ षटकांत ७ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. या आधीच्या दोन वन-डे जिंकून भारताने आधीच मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे .
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. डावातील दुसऱ्याच चेंडूवर जेमिमा रॉड्रिज शून्यावर बाद झाली. यानंतर स्मृती मानधना आणि मिताली राजने डावाची सूत्रे हाती घेतली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी रचली. अर्धशतकानंतर स्मृती बाद झाली. तिने ६२ चेंडूंत ६ चौकारांसह ५१ धावा केल्या. स्मृतीचे हे या मालिकेतील दुसरे अर्धशतक ठरले. यानंतर हरमनप्रीत कौरने अतिशय संथ खेळी केली. तिने ४१ चेडूंत १७ धावा जोडल्या. हेमलताही (६) झटपट माघारी परतली. यानंतर मितालीने दीप्ती शर्माला साथीला घेत पाचव्या विकेटसाठी ९२ धावा जोडल्या. दीप्ती अखेरच्या षटकात बाद झाली. तिने ४४ चेंडूंत ४ चौकारांसह ३८ धावा केल्या. झूलन गोस्वामीने षटकार खेचून भारताला २५३ धावांपर्यंत पोहोचविले. मितालीने १४३ चेंडूंत १४ चौकार व १ षटकारसह नाबाद १२५ धावा केल्या. मितालीचे हे सातवे वन-डे शतक ठरले, तर मागील १४ महिन्यांतील पहिलेच शतक ठरले. मितालीने १९९९मध्ये आयर्लंडविरुद्ध नाबाद ११४ धावा केल्या होत्या. ही तिची आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी होती.

संक्षिप्त धावफलक : भारत – ५० षटकांत ५ बाद २५३ मिताली राज  नाबाद १२५, स्मृती मानधना ५१, दीप्ती शर्मा ३८, हरमनप्रीत कौर १७, प्रबोधनी १-२०) पराभूत वि. श्रीलंका – ४९.५ षटकांत ७ बाद २५७ (चामरी अटापट्टू ११५, हसिनी परेरा ४५, संजीवनी २२, दिलहारी नाबाद १२, झूलन गोस्वामी २-३९, मानसी जोशी २-४३)