भारताचा विकासदर 7.3 टक्के राहणार

0

नवी दिल्ली : केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने भारताचा विकास दर घटण्याची शक्यता वर्तविल्यानंतर मोदी सरकारवर टीका झाली होती. मात्र याबाबत जागतिक बँकेने केंद्र सरकारला दिलासा दिला आहे. सरकारकडून करण्यात येत असलेल्या व्यापक सुधारणा व उपायांमुळे जगातील विकसनशील अर्थव्यवस्थेंच्या तुलनेत भारतामध्ये विकासाची अधिक क्षमता असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. जागतिक बँकेने बुधवारी 2018 साठी भारताचा विकासाचा दर 7.3 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. इतकेच नव्हे तर बँकेच्या मते, पुढील दोन वर्षे भारत 7.5 टक्क्यांच्या दराने पुढे जाऊ शकतो, असेही म्हटले आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेत विशाल क्षमता
जागतिक बँकेने 2018 ग्लोबल इकानॉमिक प्रॉस्पेक्ट प्रकाशित केले आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे सुरूवातीला बसलेल्या धक्क्यांमुळे 2017 मध्ये भारताचा विकास दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज असल्याचे या पुस्तकात म्हटले आहे. जागतिक बँकेच्या डेव्हलपमेंट प्रॉस्पेक्ट्स ग्रूपचे संचालक आयहन कोसे म्हणाले की, येत्या दशकात उभरत्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारताच्या विकासाचा उच्च दर असेल. छोट्या कालावधीच्या आकड्यांवर त्यांचे लक्ष केंद्रित नाही. एकंदर भारताच्या अर्थव्यवस्थेत विशाल क्षमता आहे. भारतातील महिला श्रमाचे प्रमाण कमी आहे. ही क्षमता वाढवल्यास मोठा फरक पडू शकतो. भारतासमोर बेरोजगारी हटवण्याचे आव्हान आहे. भारत जर या समस्या निभावण्यात यशस्वी ठरले त्यांना आपल्या क्षमतांचा योग्य वापर करता येईल. पुढील दशकात भारताचा विकास दर हा 7 टक्के राहील असेही कोसे म्हणाले.

भारत विकासाच्या मार्गाने वेगाने पुढे
मंदगती प्राप्त झालेल्या चीन अर्थव्यवस्थेशी तुलना करताना भारत विकासाच्या मार्गाने वेगाने पुढे जात असल्याचे कोसे म्हणाले. मागील तीन वर्षांतील भारताच्या विकासाचे आकडे चांगले राहिले आहेत. अहवालानुसार 2017 मध्ये चीन 6.8 टक्के या वेगाने पुढे जात होता. भारताच्या तुलनेत हा वेग केवळ 0.1 टक्क्यांनी अधिक आहे. 2018 मध्ये चीनच्या विकासाचा अंदाजे दर हा 6.4 टक्के राहील. येत्या दोन वर्षांत हा अंदाज आणखी घटून क्रमश: 6.3 आणि 6.2 टक्के राहील. भारताने आपल्या क्षमतांचा योग्य वापर करण्यासाठी गुंतवणुकीच्या शक्यता वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे कोसे म्हणाले. ते म्हणाले की, कामगार कायदा सुधारणा, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात सुधारणा आणि गुंतवणुकीसाठी येत असलेले अडथळे दूर केल्यास भारताची स्थिती आणखी चांगली राहील.