अँटिग्वा । सलामीवीर अजिंक्य रहाणे (72) आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (नाबाद78) अर्धशतकी खेळी, त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक मार्यामुळे भारताने तिसर्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 93 धावांनी सहज पराभव केला. या विजयासह भारताने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने दिलेल्या 251 धावांच्या आव्हानासमोर विंडीजचे फलंदाज पूर्णपणे ढेपाळल्याने त्यांचा डाव 38.1 षटकात 158 धावांवर आटोपला. भारताकडून आर. अश्विन आणि चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने प्रत्येकी तीन, पांड्याने दोन, उमेश यादव आणि केदार जाधवने प्रत्येकी एक विकेट मिळवली. त्याआधी वेस्ट इंडिजच्या प्रभावी गोलंदाजीसमोर अजिंक्य रहाणे आणि धोनीच्या अर्धशतकांमुळे भारताने 4 बाद 251 धावा केल्या होत्या. रहाणेने एकदिवसीय क्रिकेटमधील 18 वे अर्धशतक पूर्ण करताना 112 चेंडूत चार चौकार आणि एक षटकार ठोकत 72 धावा केल्या. या मालिकेतील रहाणेचे हे सलग तिसरे अर्धशतक आहे. धोनीने 79 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकार खेचत नाबाद 78 धावा केल्या. धोनीचे हे 63 वे अर्धशतक आहे. केदार जाधवने 26 चेंडूंत धडाकेबाज नाबाद 40, युवराज सिंगने चार चौकारांसह 39, कर्णधार विराट कोहलीने 11 आणि सलामीवीर शिखर धवनने फक्त दोन धावा केल्या. भारताच्या 46 षटकांमध्ये केवळ 200 धावाच झाल्या होत्या. पण धोनी आणि केदारने धुवाधार फलंदाजी करत शेवटच्या चार षटकांमध्ये 51 धावा ठोकल्या.
आणखी विक्रमाच्या उंबरठ्यावर
धोनी आता आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये धोनी तब्बल 70 वेळा नाबाद राहिला आहे. सर्वात जास्तवेळा नाबाद राहण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा शॉन पोलॉक आणि श्रीलंकेच्या चांमुडा वासच्या नावावर आहे. हे दोघेही 72 वेळा नाबाद राहिले आहेत.
कुंबळेनंतर आता अश्विन
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात रविचंद्रन अश्विनने 28 धावांमध्ये तीन विकेट्स मिळवल्या. या विकेट्सह अश्विनने एकदिवसीय क्रिकेटमधील 150 विकेट्स पूर्ण केल्या. अश्विनने या विकेट्स 111 एकदिवसीय सामन्यांमधून मिळवल्या. कमीत कमी सामन्यांमध्ये 150 विकेट्स मिळवण्याचा बहुमान अनिल कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळे 106 सामन्यांमध्ये या विकेट्स मिळवल्या होत्या. तीन वर्षांनंतर भारताच्या दोघा फिरकी गोलंदाजांनी एकाच सामन्यात प्रत्येकी तीन विकेट्स मिळवल्या.
पहिला भारतीय फलंदाज
294 सामन्यांमध्ये 9442 धावा करणार्या धोनी शुक्रवारी झालेल्या वेस्टइंडिजविरुद्धच्या सामन्यात आपल्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद केली. एकदिवसीय सामन्यांमध्ये षटकारांचे द्विशतक पूर्ण करणारा धोनी पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. हेलिकॉप्टर शॉटसाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये आतापर्यंत 332 षटकार मारले आहे. त्यात तो पाचव्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाल्यावर धोनीची बॅट चांगलीच तळपली आहे.
10 वर्षांनंतर पुन्हा…
1 अँटिग्वा येथील सामन्यात नाबाद 79 धावा करणारा महेंद्रसिंग धोनीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.
2 एक खेळाडू म्हणून तब्बल 10 वर्षानंतर धोनी हा पुरस्कार मिळाला.
3 आशिया एकादश संघातून खेळताना 10 जून 2007 रोजी आफ्रिका एकादश संघाविरुद्ध धोनी मॅन ऑफ द मॅच ठरला होता.
4 एक कर्णधार म्हणून धोनीने ऑक्टोबर 2015 मध्ये शेवटचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता.
5 इंदूरमध्ये आफ्रिकेविरुद्ध सामन्यात धोनीने नाबाद 92 धावा केल्या होत्या. भारताने सामना 22 धावांनी जिंकला होता
6 आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यांमध्ये धोनीने 21 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार पटकावले आहेत.