भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

0

दाम्बुला । येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या पाच एकदिवसीय मालिकेतील पहिला सामन्यात टीम इंडियाने सलामीवर शिखर धवन व कर्णधार विराट कोहलीच्या तडाखेबंद खेळीच्या बळावर यजमान श्रीलंकेचा 9 विकेट्सनी पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या श्रीलंकेने 43.2 षटकांत सर्वबाद 216 धावा केल्या होत्या. विजयासाठी भारतासमोर 217 धावांचे माफक आव्हान होते. तुलनेने सोप्या असलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने 28.5 षटकात 200 धावा करून हा सामना 9 विकेट्सनी आपल्या खिशात घातला. टीम इंडियाकडून शिखर धवनने तडाखेबंद खेळी करताना केवळ 90 चेंडूत 132 धावांची मॅचविनिंग खेळी केली. कर्णधार विराट कोहलीनेही काही अफलातून फटके मारत 82 धावा तडकावल्या. धवन व विराटवर आवर घालण्याची क्षमता कोणत्याच श्रीलंकन गोलंदाजाकडे नव्हती. लंकेला केवळ रोहित शर्माच्या रुपाने एकमेव विकेट मिळाली. रोहितही धावबाद होऊन तंबूत परतला.

रोहित शर्मा चार धावांवर धावबाद
तत्पूर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या लंकन सलामीवीरांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. परंतु चांगल्या सुरूवातीनंतरही श्रीलंकेचा डाव ढेपाळला. कसोटी मालिकेप्रमाणे पहिल्या वन-डे सामन्यातही श्रीलंकेच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. चांगल्या सुरूवातीनंतरही मधल्या फळीतल्या फलंदाजांनी अवसानघातकी खेळी केली. सलामीवीर निरोशन डिकवेला अर्धशतक करून तंबूत परतला व त्यानंतर फलंदाज बाद होण्याची जणू स्पर्धाच लागली. त्यामुळे श्रीलंकेचा संघ कसाबसा 216 धावांपर्यंत मजल मारू शकला. आजच्या सामन्यातही भारतीय गोलंदाजांची धार कसोटी मालिकेप्रमाणे कायम राहिली. भारतीय फिरकी गोलंदाजांनी लंकेला एकापाठोपाठ एक धक्के दिले. डिकवेला आणि गुणथिलकाची पहिल्या विकेटसाठी 74 धावांची अर्धशतकी भागीदारी. चहलने गुणथिलकाला माघारी धाडत लंकेची जमलेली जोडी फोडली. केदार जाधवने अर्धशतकवीर निरोशन डिकवेला याला माघारी धाडले. डिकवेलाने 8 चौकारांच्या मदतीने 64 धावांची खेळी केली. परंतु मोठी धावसंख्या रचण्यात त्याला अपयश आले. त्यानंतर अक्षर पटेलने कुशल मेंडीसचा त्रिफळा उडवत लंकेला तिसरा धक्का दिला. शिखर धवनने केवळ 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले तर 71 चेंडूमध्ये शतक ठोकले. धवनने षटकार ठोकून अर्धशतक तर चौकाराच्या मदतीने शतक साजरे केले. धवनचे एकदिवसीय सामन्यातील हे 11 वे शतक आहे. त्यापैकी 8 शतके धवनने विदेशी भूमीवर ठोकली आहेत. धवनने श्रीलंकेविरुद्ध सलग सहाव्यांदा 50 चा आकडा ओलांडला आहे.

यानंतर श्रीलंकेचा एकही फलंदाज मैदानावर फारकाळ तग धरु शकला नाही. मोठे फटके मारण्याच्या नादात लंकेचे फलंदाज भारतीय फिरकीच्या जाळ्यात अडकत गेले. 8 बाद 185 अशी संघाची अवस्था झाल्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या लसिथ मलिंगा आणि अँजलो मॅथ्यूजने थोडी फटकेबाजी केल्यामुळे लंकेला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. भारताकडून अक्षर पटेलने 3 बळी घेतले. केदार जाधव, जसप्रीत बुमराह आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी 2-2 बळी घेत लंकेचे कंबरडे मोडले.