सिडनी : रोहित शर्माने नाबाद १३३ धावां करूनही भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने भारताचा ३४ धावांनी पराभव करत या तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात भारतासमोर पाच गडी बाद २८८ धावांचे आव्हान ठेवले. पीटर हँड्सकोम्ब (७३), उस्मान ख्वाजा (५९), शॉन मार्श (५४) आणि मार्कस स्टॉइनिस (४७) यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २८८ धावा केल्या.
भारताच्या रोहित शर्माने १३३ धावांची जबरदस्त खेळी केली. त्याला एम.एस. धोनीने अर्धशतकी खेळी करून साथ दिली. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर इतर फलंदाज टिकू शकले नाही. विराट कोहली अवघ्या तीन धावांवर बाद झाला. शिखर धवन, अंबाती रायुडू खातंही उघडू शकले नाहीत, तर रवींद्र जाडेजा (८), कुलदीप यादव (३) मोहम्मद शमी (१) यांनीही निराशाजनक कामगिरी केली. भुवनेश्वर कुमारने अखेरच्या षटकांमध्ये रोहित शर्माला साथ दिली, पण तोपर्यंत डाव भारताच्या हातातून निसटला होता. परिणामी भारताचे आव्हान ९ गडी बाद २५४ धावांवर आटोपले.