भारताचा ३५ धावांनी विजय; न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली

0

वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारतानं ३५ धावांनी विजय मिळवून मालिका जिंकली. रायुडू, विजय शंकर आणि हार्दिक पंड्याच्या दमदार खेळीमुळं भारतानं न्यूझीलंडसमोर २५२ धावांचं आव्हान उभं केलं. हे आव्हान पार करताना न्यूझीलंडचा संघ २१७ धावांवर बाद झाला. या विजयासह भारतानं ही एकदिवसीय मालिका ४-१ अशा फरकानं जिंकली.

भारताने सुरुवातीचे ३ सामने जिंकून आधीच मालिका खिशात घातली होती. मात्र, भारताचा चौथ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव झाला होता. पाचव्या सामन्यातही भारताची तीच गत होईल असं वाटलं होतं. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या २ धावांवर बाद झाला. तर शिखर धवन सहा धावा करून बाद झाला. शुभमन गिलनंहीअवघ्या सात धावा केल्या. मात्र, त्यानंतर आलेल्या रायुडूनं डाव सावरत ९० धावांची जिगरबाज खेळी केली. पण त्याला धोनीची साथ मिळू शकली नाही. धोनी एक धाव करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या विजय शंकरनं चांगली साथ देत ४५ धावा केल्या तर केदार जाधवनंही ३४ धावा करून भारताची धावसंख्या वाढविली. रायुडू बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्यानं तुफान फटकेबाजी केली. त्यानं २२ चेंडूंत पाच उत्तुंग षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीनं ४५ धावा केल्या. या जोरावर भारतानं न्यूझीलंडला २५३ धावांचं आव्हान दिलं. न्यूझीलंडकडून हेनरीनं चार गडी बाद केले, तर बोल्टनं ३ जणांना तंबूचा रस्ता दाखवला.

२५३ धावांचे विजयी लक्ष गाठण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला शामीनं हेनरी निकोलसच्या रुपात पहिला धक्का दिला. विलियम्सननं ३९ धावा केल्या. मात्र, रॉस टेलर अवघ्या एका धावेवर बाद झाला. लॅथमनं ३७ धावा, जेम्स निशामनं ४४ धावा करून विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ठराविक अंतरानं न्यूझीलंडचे तळाचे फलंदाज बाद होत गेले. अखेर २१७ धावांवर न्यूझीलंडचा डाव आटोपला. या सामन्यात भारतानं ३५ धावांनी विजय मिळवून मालिका ४-१ ने खिशात घातली. ९० धावांची खेळी करणारा रायुडू सामनावीर ठरला.