गाले । सलामीवीर शिखर धवनच्या धडाकेबाज 190 आणि चेतेश्वर पुजाराच्या 144 धावांच्या शतकी खेळीमुळे भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाचे तीन विकेट्सच्या मोबदल्यात 399 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा 144 आणि अजिंक्य रहाणे 39 धावांवर खेळत होते. भारतीय फलंदाजांनी पहिल्या दिवशी यजमान संघाच्या गोलंदाजावर चांगलाच दबाव आणला. अभिनव मुकुंद (12) झटपट बाद झाल्यावर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाराने दुसर्या विकेटसाठी 253 धावांची भागिदारी केली. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने (3) निराश केल्यावर पुजारा आणि रहाणे या जोडीने चौथ्या विकेटसाठी नाबाद 113 धावांची भागीदारी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांची सत्वपरीक्षा पाहिली. बाद झालेले भारताचे तिन्ही फलंदाज वेगवान गोलंदाज प्रदीप नुवानचे बळी ठरले.
शोले चित्रपटातील खलनायक गब्बरसिंगचे डॉयलॉग मैदानावर सतत बोलत असल्यामुळे शिखर धवन त्याचे सहकारी गब्बरसिंग नावाने हाक मारतात. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळण्याच्या नशिबाने मिळालेल्या संधीचे धवनने बुधवारी सोने केले. लंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी शिखरने 190 धावांची सर्वोत्तम खेळी केली. पण या दरम्यान तो दुसर्यांदा द्विशतकाचा टप्पा पार करण्यात अपयशी ठरला. याआधी पदार्पणाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत धवनला द्विशतकाने हुलकावणी दिली होती. मार्च 2013मधील त्या सामन्यात धवन 187 धावांवर बाद झाला होता.
गुणरत्नेचा अंगठा फ्रॅक्चर
पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी श्रीलंकेला मोठा झटका बसला आहे. शतकवीर शिखर धवनचा झेल पकडण्याच्या प्रयत्नात दुसर्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणार्या असेला गुणरत्नेच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर गुणरत्नेला ताबडतोब कोलंबोतील रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीनंतर गुणरत्नेच्या अंगठ्यावर लगेचच शस्त्रक्रिया करण्यात आली. गुणरत्ने संघाबाहेर गेल्यामुळे श्रीलंकेला आता दोन्ही डावांमध्ये 10 खेळाडूंसह फलंदाजी करावी लागेल.
भारताचा मध्यमगती वेगवान गोलंदाज हार्दिक पंड्याने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये पदार्पण केले. कसोटी खेळणारा तो भारताचा 289 क्रिकेटपटू आहे. विराट कोहलीने हार्दिकला कसोटी क्रिकेटची कॅप दिली.
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा कोहलीचा निर्णय आघाडीच्या इतर फलंदाजांनी सार्थ ठरवला. कोहली मात्र अवघ्या 3 धावांवर बाद होऊन तंबूत परतला.
सलामीवीर शिखर धवनला दुसर्यांदा द्विशतकाचा पल्ला पार करण्यात अपयश आले. यावेळी तो 190 धावांवर बाद झाला. याआधी 2013 मध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध 187 धावांवर बाद झाला होता.
पुजाराचे 12 वे शतक
कसोटी क्रिकेटपटूचा शिक्का बसलेल्या चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले 12 वे शतक पूर्ण केले. त्याने सलामीवीर शिखर धवन आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या अजिंक्य रहाणेसह दोन महत्त्वपूर्ण शतकी भागीदारी केल्या.