रांची । भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला रांचीमधल्या तिसर्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस रंगतदार ठरला आहे. टीम इंडियाने आपला पहिला डाव 9 गड्यांच्या मोबदल्यात 603 धावांवर घोषित केला आहे. विशेष म्हणजे कसोटीत भारताकडे ऑस्ट्रेलियाविरोधात 152 धावांची आघाडी असून यात रवींद्र जाडेजाने डेव्हिड वॉर्नर आणि नॅथन लायनचा बाद करत चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाला 2 बाद 23 धावांवर रोखले आहे. भारताकडे अद्यापही 129 धावांची आघाडी आहे. त्यामुळेच कसोटीत टीम इंडियाला विजयाची आशा आहे. उद्या 20 मार्च रोजी सामन्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे प्रत्यक्षात भारत व ऑस्ट्रेलिया यांच्या खेळात काय बदल होतात याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून आहे. टीम इंडियाला रांची कसोटीत खर्या अर्थाने पुजारा आणि साहा यांनी सातव्या विकेटसाठी केलेल्या 199 धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियावर वर्चस्व प्रस्थापित करणे सहजशक्य झालं आहे. चेतेश्वर पुजारानं केलेलं द्विशतक, त्याचबरोबर रिद्धिमान साहाचं शतक आणि रवींद्र जाडेजाचे नाबाद अर्धशतक यांच्या जोरावर भारताने रांची कसोटीत 9 बाद 603 या धावांपर्यंत मजल मारत पहिला डाव घोषित केला होता.
मॅक्सवेलने भारतीय कर्णधाराची कृती करून उडविली खिल्ली
रांची । भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये मैदानावर अनेकवेळा वादविवादाच्या घटना घडल्या आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची झलक बंगळुरूपाठोपाठ रांची कसोटीतही पाहायला मिळाली. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने विराट कोहलीचा झेल पकडला, त्यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आनंद साजरा केला मात्र ग्लेन मॅक्सवेलने विराटची नक्कल करून त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. रांची कसोटीच्या पहिल्या दिवशी एक चौकार अडवण्याच्या प्रयत्नात विराटचा उजवा खांदा दुखावला होता. त्या वेळी वेदनांनी विव्हळणार्या भारतीय कर्णधाराने डाव्या हाताने आपला उजवा खांदा दाबून धरला होता. विराटच्या विकेटचे सेलिब्रेशन करताना मॅक्सवेलने भारतीय कर्णधाराच्या त्याच कृतीची नक्कल करून त्याच्या दुखापतीची खिल्ली उडविली.
पुजाराच्या द्विशतकाने मोडला ‘द वॉल’चा विक्रम
भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा याने आस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसर्या कसोटीत 525 चेंडूंचा सामना करत दमदार द्विशतक (202) ठोकले. पुजाराने या कामगिरीच्या जोरावर राहुल द्रविडचा विक्रम मोडीत काढला आहे. रावळपिंडीत पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळताना 2004 मध्ये भारताचा ‘द वॉल’ या नावाने प्रसिद्ध असणारा राहुल द्रविड याने 495 चेंडूंचा सामना करत 270 धावा ठोकल्या होत्या. द्रविडनंतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला इतक्या चेंडूंचा सामना करता आला नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या तिसर्या कसोटीत पुजाराने राहुल द्रविडचा हा विक्रम मोडला. रांची कसोटीत मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा या जोडीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या दोन्ही फलंदाजांनी केवळ 37 कसोटी सामन्यांत 2500 धावा केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावर होता. या दोन्ही दिग्गजांनी 42 कसोटी सामन्यात 2500 धावा केल्या होत्या. या यादीत तिसर्या नंबरवरती द्रविड आणि सेहवाग यांच्यातील भागीदारी येते. या दोन्ही स्टार फलंदाजांनीही 42 कसोटी सामन्यात 2500 धावा केल्या होत्या.
भागिदारीने धावांचा डोंगर
पुजाराने 505 चेंडूंत 21 चौकारांसह 202 धावांची खेळी केली. रिद्धिमान साहा याने आठ चौकार आणि एका षटकार लगावत 117 धावा करत भारताच्या धावसंख्येत कमालीची भर घातली. त्यानंतर मैदानावर आलेल्या रवींद्र जाडेजाने पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 54 धावा ठोकून टीम इंडियाला दिशा मिळवून दिली. पुजारा आणि साहा यांनी सातव्या विकेटसाठी रचलेल्या 199 धावांच्या भागीदारीने टीम इंडिया भक्कम स्थितीत पोहोचली. रांची कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. चेतेश्वर पुजारा आणि रिद्धिमान साहाच्या भक्कम भागीदारीच्या जोरावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावर सहजरीत्या आघाडी मिळवली. मात्र रिद्धिमान साहाला पंचांनी बाद केले असतानाच उफर वापरल्यामुळे साहाला अखेर जीवदान मिळाले. यामुळे ऑस्ट्रेलियनं संघात कमालीची नाराजी पसरली होती. चेतेश्वर पुजाराच्या खणखणीत नाबाद शतकाच्या मदतीने भारतीय संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 360 धावांचा पल्ला ओलांडला. भारतीय टीम अजूनही ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या 91 धावांनी पिछाडीवर आहे. भारताकडे अजून चार विकेट शिल्लक आहेत. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 451 धावा केल्या होत्या.