नवी दिल्ली। जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील पहिला दिवस भारतासाठी खराब ठरला. सोमवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताच्या चार पेहलवानांना पहिल्या फेरीतच पराभव पत्कारावा लागला. ग्रिकोरोमन प्रकारात भारताच्या योगेश (71किलो), गुरप्रीतसिंग (75 किलो), रवींदर खत्री (85 किलो), हरदीप (98 किलो) या पेहलवानांना दुसर्या फेरीत स्थान मिळवता आले नाही. 71 किलो गटात योगेशला जपानच्या ताकेशी इजुमीने 3-1 असे हरवले. गुरूप्रीतचे स्पर्धेतील आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले. जॉर्जियाच्या मिंडला सुलुकिडलीने 5-1 असा विजय मिळवत त्याला हरवले. 81 किलो गटात हंगेरीच्या व्हिक्टर लोरिंचीने भारताच्या रविंदर खत्रीचा 8-0 असा धुव्वा उडवला.
98 किलो गटातील हरदीपलाही देशावासियांच्या अपेक्शा पूर्ण करता आल्या नाहीत. लिथुआनियाच्या विलुस लॉरिनाईटिसने हरदीपवर 5-2 असा विजय मिळवला. रेपचेकच्या माध्यमातून स्पर्धेत पुन्हा आव्हान देण्याची संधीही भारताच्या पराभूत पेहलवानांना मिळणार नाही. भारतीय पेहलवानांवर विजय मिळवणार्या पेहलवानांना अंतिम फेरीत स्थान मिळवता न आल्यामुळे ती आशाही संपुष्टात आली.