भारताची नागपूर कसोटीवर मजबूत पकड

0

नागपूर । सलामीचा फलंदाज मुरली विजय आणि चेतेश्‍वर पुजाराच्या दमदार शतकांच्या जोरावर भारतीय संघाने नागपूर कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने पहिल्या डावात 2 बाद 312 धावांची मजल मारत श्रीलंकेवर 107 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. मुरली विजयने कसोटी कारकीर्दीतले दहावे शतक साजरे केले. त्याने 221 चेंडूंत 128 धावांची खेळी केली. यात त्याने 11 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्याचबरोबर पुजारानही 284 चेंडूंत तेरा चौकारांसह नाबाद 121 धावांची खेळी उभारली. पुजाराचं कारकिर्दीतलं हे 14 वे कसोटी शतक ठरले.

या दोघांनी मिळून दुसर्‍या विकेटसाठी 209 धावांची महत्वपूर्ण भागिदारी रचली. त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीनेही नाबाद अर्धशतक झळकावताना भारताला 300 धावंचा टप्पा ओलांडून दिला. दुसर्‍या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा पुजारा 121, तर कर्णधार कोहली 54 धावांवर खेळत होते. सलामीचा मुरली विजय आणि चेतेश्‍वर पुजारानं दुसर्‍या विकेटसाठी रचलेल्या धावांच्या अभेद्य भागीदारीने भारतीय संघाला नागपूर कसोटीवर पकड घेण्याची नामी संधी मिळवून दिली. दुसर्‍या दिवशी चहापानाला खेळ थांबला, त्या वेळी भारताने एक बाद 185 धावांची दमदार मजल मारली होती. या दोघांनी दुसर्‍या दिवसाच्या पहिल्या दोन्ही सत्रांमध्ये श्रीलंकेच्या आक्रमणावर निर्विवाद वर्चस्व गाजवले.

दुखापतीनंतर अशी खेळी महत्त्वाची
श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात शानदार शतक ठोकणारा मुरली विजय म्हणाला की, दुखापतीतून सावरल्यानंतर पुन्हा एकदा अशी शतकी खेळी करणे खूपच महत्वाची आहे. मुरलीला पहिल्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण दुसर्‍या कसोटीतून शिखर धवनने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यानंतर मुरलीने आठ महिन्यांनतर मैदानात परतल्यावर 128 धावांची शतकी खेळी केली. या खेळीसह आपल्यातील क्रिकेट अजून शिल्लक असल्याचे विजयने सिद्ध केले आहे. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विजयने सांगितले की, या खेळपट्टीवर सुरुवातीला धावा करणे जड गेले. पण पुजारा आणि मी संयमी खेळ केला. दुखापतीचा काळ माझ्यासाठी कठिण असा होता. खूप मेहनत आणि सराव करत त्या दुखापतीला मागे टाकले आहे. त्यामुळे ही शतकी खेळी खूप महत्त्वाची आहे.

पुजाराचाही विक्रम
चेतेश्‍वर पुजारा हा भारताचा विक्रमी फलंदाज होत आहे. जवळपास प्रत्येक दुसर्‍या सामन्यानंतर तो नवीन विक्रम नोंदवत आहे. नागपुर कसोटीतील दुसर्‍या दिवशी पुजाराने 2017 मध्ये कसोटी क्रिकेटमधील एक हजार धावा पुर्ण करणारा पहिला भारतीय आणि जागतिक क्रिकेटमधला तिसरा फलंदाज ठरण्याचा विक्रम केला आहे. पुजाराने या एक हजार धावा वर्षातील 10 व्या कसोटीत आणि 16 व्या डावात पुर्ण केल्या. या वाटचालीत त्याने चार शतके आणि पाच अर्धशतकी खेळी केल्या आहेत. अशा प्रकारच्या कामगिरीत द.आफ्रिकेचा डिन एल्गर पुजाराच्या पुढे आहे. एल्गरने 11 सामन्यांतील 20 डावांमध्ये 1097 धावा केल्या आहेत. पुजारा अजून नाबाद खेळत असल्यामुळे याच सामन्यात तो एल्गरला मागे टाकेल अशी आशा आहे.

मुरली तिसरा भारतीय
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जमाथामधील मैदानावर सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत मुरली विजयने कसोटी क्रिकेटमधील 10 वे शतक पूर्ण केले. सलामीचा फलंदाज म्हणून सर्वाधिक शतके ठोकणारा मुरली तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. सलामीचा फलंदाज म्हणुन सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम महान फलंदाज आणि माजी कर्णधार भारतीय फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. सलामीला फलंदाजीस येणार्‍या सुनील गावस्कर यांच्या खात्यात 33 शतके जमा आहेत. विरेंद्र सेहवाग याने 22 शतके ठोकली आहेत.