तौरंगा । मजबुत बचाव आणि धारदार आक्रमणाच्या जोरावर भारताने चार देशांच्या निमंत्रितांच्या हॉकी स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात यजमान न्यूझीलंडचा 3-1 असा पराभव केला. या चौरंगी स्पर्धेच्या विजेतेपदाच्या लढतीत भारताचा पुन्हा एकदा बेल्जियमशी सामना होणार आहे. साखळी लढतीतील सामन्यात बेल्जियमने भारताला 2-0 असे हरवले होते. शनिवारी झालेल्या सामन्यात युवा ब्रिगेड हरमनप्रीत सिंग, दिलप्रीत सिंग आणि मनदीपसिंगने प्रत्येकी एक गोल केला. बेल्जियमकडून पराभव पत्कारल्यानंतर यजमान संघाविरुद्ध मात्र भारताने मागील सामन्यातील चुकांची पुनरावृत्ती टाळली. सुरुवातीपासून आक्रमक खेळ केल्याचा फायदा भारतीय संघाला दुसर्याच मिनिटांमध्ये मिळाला.
यावेळी मनदीपने संघाला पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला. या पेनल्टी कॉर्नरचे गोलात रुपांतर करताना हरमनप्रीत कुठलीच चूक केली नाही. सामन्यातील दुसर्याच मिनिटाला झालेल्या गोलामुळे न्यूझीलंडचा संघ दडपणाखाली आला. त्यानंतर पुढची काही मिनिटे भारताने आपला बचाव मजबूत ठेवला. न्यूझीलंडला भारतीय वर्तुळात आकमण करण्याच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत.