भारताची युद्धसज्जता डळमळलेली का?

0

सेनादलांकडे दहा दिवस पुरेल इतकाही दारूगोळा नसल्याचा अहवाल ‘कॅग’ने दिला आहे. देशाच्या युद्धसज्जतेची अशी अत्यंत दयनीय अवस्था असणे शत्रूच्या पथ्यावर पडणारे आहे. तत्कालीन यूपीए सरकारच्या काळातील याविषयीची आकडेवारी समाधानकारक नाही. ‘कॅग’च्या अहवालानुसार मार्च 2013 अखेर सेनादलांना लागणार्‍या एकूण 170 प्रकारच्या दारूगोळ्यांपैकी 85 प्रकारच्या दारूगोळ्याचा साठा 10 दिवसांसाठी पुरेल इतकाही नव्हता. 125 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशाच्या युद्धसज्जतेची ही कोणती पद्धत आहे? ही देशवासीयांची, सेनादलांतील सैनिकांची फसवणूक आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शाब्दिकरीत्या विकासाच्या पुष्कळ गोष्टींना स्पर्श केला जातो. पण देशावर शत्रू युद्ध लादण्याच्या संपूर्ण तयारीमध्ये असताना केवळ आणि केवळ विकासाचा मुद्दा पुन्हा पुन्हा उपस्थित करून काय साध्य होणार आहे? शत्रूवर मात करून देश टिकला तर विकास करता येईल आणि त्याचा उपयोग होईल. ‘कॅग’च्या अहवालातून विविध क्षेत्रांतील मुद्द्यांवर बोट ठेवण्यात येत असते. त्यातून उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना तडीस नेण्यासाठी पावले टाकण्यात आली पाहिजे. तसे होत नसल्याने पुढील अहवालातही आधीचे प्रश्‍न पुन्हा उपस्थित होतात आणि त्यांना नव्या प्रश्‍नांचीही जोड असते. प्रश्‍न सुटत नसल्याने ते संपत नाहीत, त्यांचा हिमालय होतो.

देशाच्या तिजोरीमध्ये कायम खडखडाट असतो. याला एक ना अनेक कारणे आहेत. देश आणि देशाच्या सीमाचे रक्षण करताना निधीच्या तुटवड्यामुळे आवश्यक सामग्री खरेदी करणे, ती बनवण्यासाठी निधी नसणे हे नेहमीचे कारण अजिबात स्वीकार्य नाहीत. कोणत्या गोष्टींना कात्री लावू शकतो त्याचा अभ्यास करून सेनादलांच्या शस्त्रसज्जतेत बाधा येणार नाही. हे केव्हा पाहिले जाणार? भविष्यात युद्ध झालेच तर भारताचे अतोनात नुकसान होईल हे सांगण्यास कोणाचीही आवश्यकता नाही. भारताची युद्धसज्जता काय आहे हे शत्रूला पूर्वीपासून माहीत होते की काय? म्हणूनच ही संधी साधत शत्रू भलताच आक्रमकपणा दाखवत आहे. कमजोरबाजू पाहूनच शत्रू आक्रमण करत असतो आणि भारत सध्या कमजोर स्थितीतच आहे. म्हणूनच शत्रूला जोर आला आहे. देशासाठी प्राणपणाने लढणारे लढवय्ये सैनिक सेनादलांना लाभले आहेत. पण शत्रूला जेरीस आणण्यासाठी आवश्यक युद्धसामग्रीच नसेल तर त्यांनी शत्रूशी दोन हात कसे करावे? देशाच्या वार्षिक अर्थसंकल्पातील मोठी रक्कम संरक्षण खात्यावर गुंतवण्यात येत असल्याचे समजत असते. असे असूनही गुंतवणुकीच्या तुलनेत दिसत असलेली फलनिष्पत्ती अत्यल्पाहून अत्यल्पच म्हणावी लागेल.

देशामध्ये निवडणूक या विषयापेक्षा कोणताही विषय गांभीर्याने घेतला जातो का, असा प्रश्‍न कायमच सामान्य जनतेला पडत असतो. एवढेच महत्त्व जर ‘संरक्षण’ या विषयास दिले असते तर आज देशाच्या युद्ध सज्जतेचे वाभाडे निघाले नसते. ‘संरक्षण’ हा विषय जनहित पाहता गांभीर्याने घेण्यात आला नसला, तरी स्वतःच्या ‘संरक्षण’ सज्जतेकडे सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत असते. यावरून जनतेला कोणी वालीच नाही, असे समजायचे का? सीमेवरील दहशतवादी कारवायात जवान हुतात्मा होत असतात.
जयेश राणे – 9323790577