नवी दिल्ली । पुढील वर्षी लंडनमध्ये खेळल्या जाणार्या महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचा पहिला सामना 21 जुलै रोजी यजमान इंग्लंडशी होईल. या स्पर्धेत भारताचा ब गटात समावेश करण्यात आला असून या गटात इंग्लंडसह सातवे मानाकंन असलेल्या अमेरिका आणि आयर्लंडचा समावेश आहे. या विश्वचषक स्पर्धेत 16 देश सहभागी होत असून सातवे मानाकंन असलेल्या भारताचा दुसरा सामना 26 जुलै रोजी आयर्लंडशी आणि शेवटचा सामना 29 जुलै रोजी अमेरिकेशी होईल. भारतीय संघाचे मार्गदर्शक हरेंद्रसिंग स्पर्धेच्या ड्रॉबद्दल म्हणाले की, ब गटातील आव्हानासाठी आम्ही तयार आहोत. इंग्लंड आणि अमेरिकेचे मानाकंन भारतीय संघाहूून चांगले असले तरी संघाचा खेळ आता उंचावलेला आहे. मागील काही महिन्यातील कामगिरी संघाचे मनोबल उंचावणारी आहे. विश्वचषक स्पर्धेतील प्रत्येक सामना महत्वाचा आहे. प्रत्येक सामना हा अंतिम सामना समजून खेळावे लागेल.
विद्यमान विजेते आणि पहिले मानाकंन असलेल्या नेदरलँडच्या संघाचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात त्यांच्यासमोर चीन, कोरिया आणि इटलीचे आव्हान असेल. जागतिक मानाकंनात तिसर्या स्थानावर असलेल्या अर्जेटिना, जर्मनी, स्पेन आणि द. आफ्रिकेचा एकाच क गटात समावेश करण्यात आला आहे. ड गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपानच्या जोडीने युरो हॉकी उपविजेता बेल्जीयम आहे.