गोल्डकोस्ट । राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या दुसर्या दिवशीही भारताची सुवर्ण भरारी कायम राहिली. संजिता चानूने वेटलिफ्टींगमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून दिले, तर 18 वर्षीय दीपक लाथेरने देशाला चौथे पदक मिळवुन दिले. दिपक पुरुषांच्या 69 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले. महिलांच्या 53 किलो वजनी गटामध्ये स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये संजिताने 192 किलो वजन उचलले आणि सुवर्णपदकावर कब्जा केला. पापुआ न्यू गिनीच्या लोआ डिका टोऊआने 182 किलो वजन उचलून रौप्य आणि कॅनडाच्या रिचेल बँजीटने 181 किलो वजन उचलत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. चानूने यापूर्वी 2014 ग्लास्को राष्ट्रकुल स्पर्धेत 48 किलो गटामध्ये सुवर्ण कामगिरी केली होती तसेच गतवर्षी पार पडलेल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेतही तिने सुवर्णपदकावर नाव कोरले होते. भारताचा 18 वर्षीय युवा वेटलिफ्टर दीपक लाथेरने राष्ट्रकुल 2018 मध्ये कांस्यपदक पटकावले आहे. शेतकरी कुटुंबातील दीपक लाथेरने 69 किलो वजनी गटामध्ये 294 किलो वजन उचलून पदक पटकावले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत वेल्सच्या गॅरेथ इव्हान्सने 299 किलो वजन उचलून देशाला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. तर श्रीलंकेच्या दिसानायकाने रौप्य कामगिरी केली. त्याने 297 किलो वजन उचलले. यापूर्वी आशियायी चँम्पियशिपमध्ये हरयाणाच्या दीपकने एक सुवर्ण आणि दोन कांस्य पदकाची कमाई केली होती तसेच दोन वर्षापूर्वी वेटलिफ्टिंगचा राष्ट्रीय विक्रमही त्याने आपल्या नावे केला होता. दुसर्या दिवशी भारताची पदक संख्या चार झाली. ही चार पदके वेटलिफ्टिंगमध्ये मिळाली आहेत.
गुरुराजची संघर्षमय वाटचाल
21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेला सुरुवात झाली आहे. रौप्य पदकाची कमाई करत कर्नाटकच्या गुरुराजाने भारताचे खाते उघडले. 56 किलोवजनी गटामध्ये 294 किलो वजन उचलून गुरुराजाने रौप्य पटकावले. देशाचे नाव उंचावणारा गुरुराजा हा कर्नाटकच्या कस्बे कुंडूपारा या छोट्या खेड्यात राहतो. 2010 मध्ये वेटलिफ्टिंग करिअरला सुरवात करणार्या गुरुराजाचे आयुष्य खूप संघर्षमय राहिले. गुरुराजाचे वडील ड्राईव्हर असून त्यांना आठ मुले आहेत. गुरुराजा हा त्यांचा पाचवा मुलगा. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सुरुवातीच्या काळात गुरुराजाला अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागले. एका वेटलिफ्टरला लागणारा खुराकही त्याला मिळत नसे. अशा परिस्थितीही त्यांच्या वडिलांनी त्याला नेहमी साथ दिली. खेळासाठी नेहमी प्रोत्साहित केले. अशा कठीण परिस्थितीवर मात करून गुरुराजाने मिळवलेले हे पदक नक्कीच कौतुकास्पद आहे. गुरुराजाने सुशील कुमार पासून प्रेरणा घेतली. गुरुराजाचा कुस्तीपटू व्हायचे होते. मात्र, नंतर त्याने वेटलिफ्टिंगमध्ये नशीब आजमावले.
भारतीय महिला हॉकी संघाने 21 व्या राष्ट्रकुल
स्पर्धेच्या दुसर्या दिवशी मलेशियाचा 4-1 ने पराभव केला. राष्ट्रकुलमध्ये वेल्सकडून झालेला पराभव विसरुन भारतीय महिला संघाने मलेशियाविरुद्ध दमदार कामगिरी केली. भारताकडून पहिला गोल गुरजीत कौरने सहाव्या मिनिटाला केला. मात्र, यानंतर दोन्ही संघामध्ये कडवी टक्कर पाहायला मिळाली. मध्यांतरापर्यंत भारत 1-0 ने आघाडीवर होता. यानंतर मलेशियाने 38 व्या मिनिटाला पॅनल्टी कॉर्नरवर गोल करत सामन्यात बरोबरी केली. यानंतर लगेचच 39 व्या मिनिटाला पुन्हा भारताच्या गुरजीत कौरने पॅनल्टी कॉर्नरवर गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर 55 व्या मिनिटाला राणी रामपाल आणि 59 व्या मिनिटाला लालरेमिलियामीने गोल करत भारताचा विजय निश्चित केला.